'शिखर धवन आणि के एल राहुलवर संक्रांत आली बघ'... 'त्याच्याशी पंगा घेतला की आलीच समज संक्रांत तुझ्यावर'... या वाक्यांमधील 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार आपण बऱ्याचदा ऐकतो, वापरतो. काहीतरी वाईट होणं, संकट ओढवणं या अर्थाने तो वापरला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत हा दिवस शुभ की अशुभ, अशी शंका अनेकांच्या मनात येते. त्याचं शास्त्रशुद्ध उत्तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. या दिवसापासून दिनमान मोठं होण्यास सुरुवात होते. म्हणजेच, अंधार कमी होऊन आणि प्रकाशाचं पर्व सुरू होतं. या दिवशी आपण तीळगूळ वाटून स्नेह वृद्धिंगत करतो, गोडवा पसरवतो, आकाशात पतंग उडवून आनंद साजरा करतो, असा दिवस अशुभ असूच शकत नाही, असं दा. कृ. सोमण यांनी अगदी ठामपणे सांगितलं. संक्रांत येणं हा वाक्प्रचार कुठून आला ठाऊक नाही, पण संक्रांत या सणाचा आणि वाईटाचा किंवा संकटाचा काहीच संबंध नाही, असं ते म्हणाले. संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. या काळ्या रंगामुळेही काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. पण, मुळात काळा रंग काही अशुभ नाही आणि संक्रांतीला हा रंग वापरण्यामागचं कारण वातावरणाची संबंधित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संक्रांत १५ जानेवारीलाच!
संक्रांत कधी साजरी करायची, हा प्रश्नही गेल्या काही वर्षांमध्ये चर्चिला जातो. १४ जानेवारीला की १५ जानेवारीला, यावरून थोडा संभ्रम असतो. २०१२ मध्ये १५ जानेवारीला सूर्यानं मकर राशीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्या वर्षी १४ जानेवारीऐवजी १५ जानेवारीला मकर संक्रांत साजरी करण्यात आली होती. त्यानंतरही याच दिवशी संक्रांत साजरी झालीय आणि यंदाही ती १५ तारखेलाच साजरी करावी, असं अभ्यासकांनी सांगितलं. वास्तविक, सूर्य ज्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ती मकर संक्रांत असते. यंदा हे संक्रमण १५ तारखेला होणार आहे.