सदगुरू श्री वामनराव पैमाणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष देखील करु शकते,विकासही करु शकते. पण ही बुध्दी विनाशाकडे जास्त झुकते व विकासाकडे जात नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. जर माणसाने आपल्या बुध्दीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर तो या जगाचे नंदनवन करू शकतो कारण माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. माणसाने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली तसे परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे. त्याचसोबत हे ही लक्षांत ठेवली पाहिजे की परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो.
माणूस हा परमेश्वराचे प्रतिक आहे म्हणूनच माणसाने सुखी होण्यासाठी काय केले पाहिजे हया प्रश्नाचे उत्तर आपोआप आले. लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करण्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद द्या. आपले वाडवडिल आपल्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात. मला मला काही लोक सांगतात आमच्या डोक्यावर हात ठेवा. त्याला बरे वाटते म्हणून मी ठेवतो. आपण त्याला आशिर्वाद देण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भस्मासूर त्याचे भस्म करण्यासाठीच त्याच्या डोक्यावर हात ठेवत होता. अशी जगात दोन माणसे आहेत. सूर व असूर अशी दोन प्रकारची माणसे या जगात आहेत. देव व दानव दोन्ही माणसांत आहे. माणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे.
आपण म्हणतो माणसासमोर अनेक प्रश्न आहेत पण मी म्हणतो माणसाच्यापुढे एकच प्रश्न आहे व तो म्हणजे आपण देव व्हायचे की दानव व्हायचे. देव व्हायचे ठरविले की माणसाचे सर्व प्रश्न सुटतात व तो सुखी होतो व त्याने दानव व्हायचे ठरविले किंवा ठरवायला कशाला पाहिजे तो दानव झालेलाच आहे व त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. घरामध्ये, दारामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये कुठेही बघा सर्वत्र प्रश्न, समस्या, संकटे, दु:ख हे सर्व पहायला मिळते याचे कारण माणूस आपल्या बुध्दीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही. तो देव होत नाही तर तो दानव होतो. माणूस जर देवाची प्रतिकृती आहे तर तो देव होण्याऐवजी दानव का होतो. त्याचे एक कारण असे की पाणी हे जमिनीवर पडले की ते खालच्या दिशेने वहाते तसे माणसाचा कल हा सखल दिशेला जातो.