जागृती म्हणजे निव्वळ जागे असणे नव्हे. मानसिक, वैचारिक, शारीरिक सर्व पातळीवर सर्व क्षमतांनी संवेदनशील असणे म्हणजे जागृती. आपल्या संतांनीही सामान्य माणसाला जागृत करण्यासाठी अनेकप्रकारे सजग राहायला सांगितले. विनाकारण कुठेही आपली भक्ती वाया घालवू नका. माणसे पारखा. असा अलिखीत संदेशच संतांनी मनुष्याला दिला आहे. जागृतीचे महत्व पटवून देताना ‘मी’पणा बाबतही विस्तृत विवेचन केले आहे. प्रत्येक मनुष्य बोलताना ‘मी’ आणि ‘माझे’ अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्ये असतात. ‘माझे’ या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात ‘मी’चे कर्तत्व परमेश्वरप्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तत्व देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. ‘कर्तत्व’ याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे; असा आहे. मनुष्याने ‘मी’आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. ‘मी’चे कर्तत्व करीन; पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली, पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, ‘मी’चे कर्तत्व, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तत्व, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आत-बाहेर गोड असावे.
-वेदांताचार्य राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा.जि. बुलडाणा.