- रमेश सप्रे
मंदिरात आरती चालू होती. ती संपल्यावर मंत्रपुष्प, छान एका सुरात म्हटलं गेलं. शेवटी गुरुजींनी श्लोक म्हणून सर्व भक्त भाविकांना उद्देशून म्हटले, ‘सर्वे जन: सुखिनो भवन्तु।’ यावर जर्वजण उद्गारले ‘तथास्तु!’ असं एकूण तीन वेळा झालं. त्यानंतर शांतिमंत्र म्हटला गेला. त्याच्या अखेरीस त्रिवार उच्चार झाला ‘ॐ शांति: शांति: शांति:’छोटा चैतन्य मोठा चौकस होता. त्याला या त्रिवार उच्चाराची मजा वाटली. उतावळेपणानं त्यानं आजोबांना विचारलंही. आजोबा काहीतरी बोलणार एवढ्यात त्या मंदिरात शेवटी म्हटले जाणारे श्लोक सुरू झाले. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु’ असं चारवेळा म्हटलं गेलं. आता चैतन्य बुचकळ्यात पडला. ‘मघाशी म्हणताना तीनदा म्हटलं आणि आता चारवेळा का?’ असा प्रश्न त्यानं आजोबांना विचारला सुद्धा.आजोबा शांतपणे म्हणाले, ‘अरे कोणत्याही गोष्टीच्या किंवा घटनेच्या तीन अवस्था असतात. आरंभ-मध्य-अंत. आपल्या सुद्धा तीन अवस्था असतात. जागेपण (जागृती) स्वप्न आणि गाढ झोप. या तिन्ही अवस्थात मनात असेल त्यानुसार घडावं म्हणून तीनदा ‘तथास्तु’ आणि या तिन्ही स्थितीत शांतीचा अनुभव यावा म्हणून त्रिवार ‘शांती’.आता चारवेळा ‘तथास्तु’ का म्हटलं ते ऐक. जसं झोपेच्या गाढ अवस्थेच्या पलीकडे झोपेचा अनुभव घेणारी एक अवस्था असते, तिला तुर्या किंवा समाधी असं म्हणतात. ती खरी आनंदाची अवस्था असते. तिच्या प्राप्तप्तीसाठी म्हणतात तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु...हे सांगणं चैतन्याच्या डोक्यावरून गेलं हे लक्षात येताच आजोबा म्हणाले, ‘गाढ झोपेतून उठल्यावर आपण म्हणतो ना मला छान, शांत झोप लागली होती.’ या शांत झोपेचा अनुभव घेणार कोण तरी जाग असायला पाहिजे ना? त्यासाठी चौथ्यावेळी ‘तथास्तु’ म्हणायचं. खरंच आहे. ‘अनुभव’ ही अध्यात्मातली म्हणजे परमार्थातलीच नव्हे तर जीवनातलीही महत्त्वाची स्थिती आहे. अनुभवाशिवाय सारं अपूर्ण आहे. व्यर्थ आहे.‘तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु...’ ही श्लोकत्रयी आहे. या तीन अतिशय अर्थपूर्ण श्लोकातील पहिल्या श्लोकाचा भावार्थ पाहू या.घडो सर्वदा भक्ति या राघवाची।जळो कामना, दु:ख, चिंता भवाची।यश: श्री सदानंद कल्याणमस्तु।तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु...।।१।।पहिला शब्द महत्त्वाचा आहे. ‘घडो!’ ज्या मुद्दाम प्रयत्न, योजना केली जात नाही ती गोष्ट ‘घडली’ असं आपण म्हणतो. जसं उपवास घडला, गुरुंचा अनुग्रही घेण्यापेक्षा ‘घडायला’ हवा. अशा घडण्यात ईश्वरी संकेत असतो. ‘घडो’ म्हणण्यात सातत्य म्हणजे सतत घडो हाही भाव असतो. ‘सुसंगति सदा घडो’ असं म्हणताना हाच भाव मनात असतो. सर्वदा म्हणजे अर्थातच सतत. ‘भक्ति या राघवाची’ या रामाची भक्ती घडू दे. असं म्हणताना डोळ्यांना दिसणारा दर्शन-स्पर्शत-सेवन करता येणारा मूर्त राम सुचवला गेलाय. ‘गमूं पंथ आनंत या राघवाचा’ असं म्हणताना हाच भाव आहे. समोर दिसणारा, सर्वांच्यात दिसणारा, सदासर्वत्र अनुभवता येणारा रामच आपल्या नित्य भक्तीचा विषय बनतो.अशी भक्ती केल्यामुळे ‘जळो कामना, दु:ख, चिंता भवाची’ ही प्रार्थना प्रत्यक्षात अनुभवता येते. कामना म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा नष्ट व्हाव्यात म्हणजे त्यांची आसक्ती नष्ट व्हावी. जिवंत असेपर्यंत काही ना काही इच्छा राहणारच; पण त्या रामापायी समर्पण करून त्याची इच्छा म्हणून स्वीकारल्या पाहिजेत.त्याच प्रमाणे संसारातली दु:खं, चिंताही नष्ट व्हायला हव्यात. हे शक्य आहे का? प्रारब्धाप्रमाणे दु:ख भोगावं लागतं पण चिंता? भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयीच चिंता असतात. मरेपर्यंत जीवनाला भविष्यकाळ असणारच. म्हणून म्हटलंय ना चिंता चितेवरच (सरणावरच) सरतात. यक्षानं युधिष्ठिराला विचारलं, ‘पृथ्वीवर गवतापेक्षा उदंड काय?’ त्यानं उत्तर दिलं ‘मानवाच्या मनातील चिंता’ हे दु:ख, इच्छा, चिंता संपणे कसं नि केव्हा शक्य आहे? उत्तर ऐकायला सोपं पण त्याप्रमाणे जगायला अतिशय कठीण आहे. रामाच्या (किंवा कोणत्याही देवाच्या, सद्गुरुंच्या, संताच्या नामात (नामस्मरणात) प्रत्येक श्वास घेणं हाच तो उपाय आहे. पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘श्वासाश्वासावर नाम घेतलं पाहिजे’ असा अनुसता संकल्प जरी मनात अला तरी मनोदेवता अंतर्यामीचा राम (परमेश्वर) आशिर्वाद देईलच. ‘तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु!’