- सद्गुरू जग्गी वासुदेव
पूर्वेकडील सर्वाधिक पवित्र स्थळ म्हणजे काशी, जे आज बनारस म्हणून ओळखले जाते. काशीला या विश्वाचा गाभा समजले जाते. काशीचे निर्माण नक्की केव्हा झाले आहे हे कोणालाच माहिती नाही. दंतकथांनुसार हे खूपच प्राचीन, काळातीत ठिकाण आहे. आत्मज्ञानाच्या साक्षात्कारासाठी या स्थळाचे निर्माण करण्यात आले आणि संपूर्ण शहर एका विशिष्ट संरचनेत वसवले गेले - सात स्तरांमध्ये. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हे सातही स्तर पार करून जाणे आवश्यक होते. काशीचे आणखी एक नाव म्हणजे ‘महा-स्मशान’, म्हणजे ‘अंत्यसंस्काराचे श्रेष्ठ ठिकाण.’ मणिकर्णिका घाट हे काशीचे केंद्रस्थान म्हणजेच काशीचा गाभा आहे, जेथे सतत नेहमी किमान एक तरी प्रेत जळताना दिसतेच. त्या ठिकाणी मरण पावलेल्यांसाठी आणि दहन केल्या जाणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक असे वातावरण निर्माण केले गेले होते़ जर कोणी हे सातही स्तर पार करतात, तर नक्कीच ते पंचमहाभूतांच्या बंधनातून मुक्त होतात. अगदी प्राचीन काळापासून, अशी परंपरा होती की वृद्धत्व चाहूल लागताच लोक काशीला जाऊन राहत असत कारण त्यांना आपला मृत्यू तिथेच व्हावा असे वाटायचे. आजकाल ही केवळ एक श्रद्धा बनली आहे; परंतु त्या काळी, तिथे आत्मज्ञानप्राप्तीची एक जिवंत प्रक्रिया उपलब्ध होती आणि या शहराचे निर्माण आत्मज्ञानप्राप्तीचे एक साधन म्हणून केले गेले होते, जर तुम्ही ते सात स्तर पार करू शकलात, तर मणिकर्णिका घाटावर पोहोचेपर्यंत आत्मज्ञान प्राप्त झालेले असेल आणि हे शरीर सोडून जाण्यापूर्वी, तुम्ही पंचमहाभूतांच्या खेळापलीकडे पोहोचाल अशी व्यवस्था होती.