- फा. फ्रान्सिस दिब्रिटो‘स्त्री आणि पुरुष ही एका संसाररथाची दोन चाकं आहेत’, असं सुभाषित आपण शाळेमधून शिकलो. प्रत्यक्षात स्त्रीची अवस्था काय आहे? धर्मग्रंथाने तत्त्वत: स्त्रियांना चांगला दर्जा दिला आहे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की, परमेश्वराने स्त्री व पुरुषाची निर्मिती एकमेकांना पूरक अशी केली आहे. स्त्री आणि पुरुष दोघंही परमेश्वराची प्रतिमा आहेत. हिंदू धर्मग्रंथाने स्त्रीचं गौरवीकरण केलं आहे. तिथे म्हटलेलं आहे ‘गात्र नारियास्तु पूज्यंते, तत्र रमन्ते देवता’. म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता अवतरत असते. ही धर्मवचने ऐकताना खूप चांगले वाटते; परंतु कधी कधी पुराणातील वांगी पुराणातच असा अनुभव आपल्याला येतो.पुरुषाच्या मानसिकतेमध्ये मूलभूत बदल झाल्याशिवाय स्त्री आणि पुरुष समान आहेत हे तत्त्व स्वीकारणं पुरुषाला अवघड आहे. स्त्री-पुरुष समान आहेत हे सूत्र युरोपीयन समाजाने स्वीकारलेलं आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या दैनंदिन जीवनात येतो. स्त्रीदाक्षिण्य हा तेथील समाजाचा स्थायीभाव आहे. पतिपत्नी संसारातील जबाबदाऱ्या विभागून घेतात, याचा प्रत्यय मला माझ्या युरोपमधील वास्तव्यात आला.स्कॉटलंडला मी एका चर्चमध्ये सेवा देत होतो. तिथे असताना एका महाराष्ट्रीयन भगिनीने माझ्याशी संपर्क साधला. माझ्या वर्तमानपत्रातील लेखांमुळे आमचा पूर्वपरिचय झाला होता. त्यांनी मला त्यांच्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलं. मी ते आनंदाने स्वीकारलं. मला घेण्यासाठी ती भगिनी कार घेऊन आली. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मी तिच्या घरी पोहोचलो. तिने माझी तिच्या स्कॉटिश पतीशी ओळख करून दिली. दोघांनी एकत्र मिळून स्वयंपाक केला होता. त्या दिवशी धुणीभांडी करण्याचं काम त्याच्याकडे होतं. मला चर्चमध्ये पोहोचवावं असे तिने आपल्या पतीला सांगितलं. त्याबदल्यात धुणीभांडी करण्याचं काम तिने करावं, असं त्याने तिला सांगितलं. तिने ते आनंदाने स्वीकारलं. ही खरी स्त्री-पुरुष समानता!
स्त्रीशक्तीच्या जागरासाठी पुरुषांनी मानसिकता बदलणं आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 5:02 AM