डॉ. दत्ता कोहिनकर-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात स्वत:चे संरक्षण करण्यासाठीच्या अनेक उपाययोजना सर्व डॉक्टर, प्रशासन व प्रसारमाध्यमे सांगत आहेत. ही सर्व खबरदारी शरीराची काळजी कशी घ्यावी याबाबतची आहे. मात्र शरीराबरोबरच मनाचाही विचार करणे आवश्यक आहे. सत्तर टक्के आजार मानवी मनाशी संबधित असतात. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सबलतेसाठी जसे आपण योग्य आहाराकडे लक्ष देतो त्याचबरोबर मनाचा आहार सुद्धा महत्वाचा आहे.
आपण सतत घरात असल्याने खूप विचार मनात येतील. त्यामध्ये नकारात्मकता, भीती , नैराश्य, चिंता, बैचेनी, जास्त असेल. याला तोंड देण्यासाठी रोज सकाळ , संध्याकाळ ध्यान धारणा करणे, रोज डॉक्टरने लिहून दिलेली औषध वेळेवर घेणे व पथ्य सांभाळणे, त्याच प्रमाणे ज्याला रुचेल ती साधना त्यांनी मनापासून करणे आवश्यक आहे. रोज व्यायाम, सकारात्मक विचार व स्वयंसुचना वारंवार द्या, प्रेरणादायी व्हिडिओ पाहा, ऑनलाईन आवडते कोर्स करा, संगीत ऐका, वारंवार कोरोना बद्दलची अपडेट टाळा व आवडत्या पुस्तकांचे वाचन करा, घरातील बैठे खेळ,बुद्धीबळ, पत्ते, सापशिडी असे एक ना अनेक खेळले पाहिजे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला आता दोन आठवडे झाले आहेत. कधीही इतके दिवस घरी न राहिलेल्या नागरिकांना तब्बल एकवीस दिवस घरातच बंदिस्त राहवे लागत आहे. त्यातही देशातील विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन चा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. शरीराबरोबरच आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी या काळात प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. हे मानसिक स्वास्थ्य निरोगी कसे ठेवता येईल याविषयी काही मार्गदर्शक टिप्स व सुचना केल्या आहेत.
रणांगणात लढणाऱ्या योद्ध्याला प्रतिस्पर्धाकडून वार होणार हे माहिती असते म्हणूनच योद्धा ढाल व शस्त्र घेऊनच रणांगणात सर्व तयारीनिशी उतरत असतो. तशीच आपली उत्तम प्रतिकारशक्ती ( शरीर व मनाची सुद्धा) हिच कोरोना विरुद्ध लढण्याची ढाल आहे. त्याच बरोबर सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतःपालन करून आपण योग्य ती खबरदारी घेतली तर आपण कोरोना व ताणतणावापासून निश्चितच सुरक्षित राहू, घरीच रहा, सुरक्षित रहा आणि कोरोनाचा मुकाबला करा.