- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)
दयेविषयी अनेकांची अनेक मतं आहेत पण देव मिळविण्याचा राजमार्ग म्हणजे दया. जीवन जगत असताना दया ही अत्यंत आवश्यक आहे. आत्यंतिक प्रेम म्हणजे दया.
व्यासमहर्षि दयेची शास्त्रशुद्ध व्याख्या सांगतात -
दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा ।सर्वेन्द्रियोप शान्त्या च तुष्यत्या शु जनार्दन: ॥
सर्व इंद्रियांचा निग्रह करुन प्राणीमात्रांवर दया केल्याने जनार्दन संतुष्ट होतो पण त्यासाठी आधी इंद्रियांचा निग्रह म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणं महत्वाचं आहे.
एकदिवस तुकाराम महाराज भजन गात होते. भजन संपलं आणि त्यांचा आवडता टाळकरी शिवबा कासार पुढे आला आणि म्हणाला, महाराज.! उद्या एकादशी. आपण खूप मोठे आहात पण उद्या माझ्या गरिबाच्या घरी आलात तर माझं घर पवित्र होईल. माझ्या घरांत शांती नांदेल. तुकाराम महाराज होऽ म्हणाले. शिवबाने घरी येऊन आपल्या पत्नीला सांगितले, अगं.! उद्या मी तुकाराम महाराजांना आपल्या घरी बोलावलं आहे पण ती काहीच बोलली नाही. आपला नवरा त्या टाळकुट्या तुकोबांच्या नादी लागलेला तिला अजिबात पटत नव्हता. ती गप्प बसली. पहाट झाली. शिवबा तुकोबांना आणण्यासाठी निघाला. त्याच्या पत्नीने पातेलंभर पाणी चुलीवर उकळायला ठेवलं. महाराज आले आणि अंगणात पाय धुण्यासाठी वाकले. एवढ्यात स्वयंपाक घराच्या खिडकीतून तिने उकळलेले पाणी तुकोबांच्या पाठीवर ओतले. मरणांत वेदना झाल्या. तुकोबांच्या तोंडातून आर्त शब्द उमटले, पांडुरंगा.! धावऽ रे.! शब्द ऐकून शिवबा धावत आला. महाराजांच्या पाठीवर फोड आले होते. ते दृश्य पाहून जवळ पडलेले पेटते लाकूड घेऊन शिवबा पत्नीच्या अंगावर धावला- थांब.! चांडाळणी.! काय केलंस हे.? ह्या विस्तवाने तुला डाग देतो म्हणजे तुला तुकोबांच्या यातनांचे दु:ख कळेल पण तुकोबांनी शिवबाचा हात धरला आणि ते म्हणाले, तिला का मारतोस..? हे माझ्या पूर्वजन्मीचे संचित आहे. तात्पर्य, स्वतःचे दु:ख दूर सारुन, इतरांच्या दु:खाचा विचार करणं म्हणजे दया..!
भूतांचि दया हे भांडवल संता ।आपुली ममता नाही देही ॥
तर ज्ञानराज माऊली म्हणते -
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ॥
मग प्रश्न असा निर्माण होतो की, दया सर्वांवरच करायची कां..? तुकोबा म्हणतात -
देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।तेथे पैजाराचे काम । अधमासी तो अधम ।।
आपण जर देवघरावरील विंचवाची पूजा करायला लागाल तर तो तुम्हाला डंख मारणारच म्हणून दया करताना तो दया करण्या योग्य आहे का? हे बघून दया करा. सर्पाला कितीही दूध पाजलं तरी त्याचं विषच होणार आहे. मोरोपंत म्हणतात -
दुःखात जीव दिसता चित्ताला यातना जरी होती ।ते दुःख दूर करण्या साठी करि यत्न ती दया म्हणती ॥
जे दुःख पाहून आपल्या अंतःकरणांला पीळ पडतो त्याच्यावर दया दाखविणे म्हणजे प्रेम जे ईश्वराला आवडतं आणि असं प्रेम करणारांसाठी तो येतोच. नाथांघरी कावडी वाहिल्या, गोरोबांची मडकी घडविली, चोखोबांची गुरं राखली, जनाबाईंचं दळण दळलं, मीरेसाठी विष प्याला, गजेंद्रासाठी धावून आला पण यासाठी आपला अहंकार, देहभाव संपला पाहिजे. नाथबाबा म्हणतात -
देह शुद्ध करुनी भजनी भजावे ।अनेकांचे नाठवावे दोष गुण ॥
एकदा दया आत्मसात झाली की क्षमा आणि शांती ओघानेच येते.
दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती ।
दयेने माणूस विश्वावर प्रेम करायला शिकतो. म्हणून साने गुरुजी लिहितात -
" जाईचा मांडव आपल्या घरापुरता घातला तरी चालेल पण प्रेमाचा मांडव शेजारच्या घरावर घालायलाही विसरु नका..! "
फक्त दया करतांना -
पात्रापात्र विवेकोस्तु धेनू पन्नग रेव च ।
ज्यांचं या मातीशी आणि मातेशी प्रेम आहे, नातं आहे त्यांच्यावरच दया करा अन्यथा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
धटासी आणावा धट । उद्धटासी उद्धट ।
जो दुष्ट प्रवृत्तीचा, दुराचाराचा, अनीतीचा अवलंब करुन घर, गाव, देश, राष्ट्र यांच्या नाशाला कारणीभूत होतो त्याला दया न दाखविता त्याच्यातील वाईट वृत्ती नष्ट करणे हीच खरी दया आणि हेच खरे प्राणीमात्रांचे पालन..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )