मनुष्य खरेच जसा वागतो, तसा अंत:करणापासूनही वागत असतो का? ते त्याच्या काही कृतीनुसार लक्षात येते. कारण त्याच्या मनोवृत्तीनुसार तो इंद्रियांना चालना देतो. मनाचे ग्रह बदलले की माणूस बाह्य कृतीत बदल घडवतो म्हणून मनाला चांगले वळण लावा. मन सतत अभ्यासात गुंतून ठेवा म्हणजे बाह्य इंद्रियांना नियमितपणाचे वळण पडेल आणि मग अंत:करणात सुख वाढेल. अशा ठिकाणी मन:स्थिती स्थिर ठेवण्याचा अभ्यास महत्त्वाचा असतो. नियमाने मनाला वागण्याची सवय लावा. कारण आयुष्याला स्थिर करणारे मनच असते. मनाची बेचैन अवस्था झाली की, इंद्रियांवर आपले नियंत्रण राहू शकत नाही. इंद्रिये सैरावैरा धावू लागतात. मग आपण आपले-परके न पाहता कोणावरही आरोप करतो. कुणालाही बोलत राहतो. नको त्या गोष्टी मनात आणतो. आणि आपणच आपला नाश करून घेतो म्हणून मनुष्याच्या जीवनात मन:स्थिती सांभाळणे, त्याला स्थिर करणे, आपल्या हितासाठी जे जे चांगले त्याची सवय लावणे, इंद्रियांना दुष्ट प्रवृत्तीकडे वळू न देणे हा अभ्यास मनाला करायला लावावे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले मन विषयापासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो, ते सुख सर्वोत्कृष्ट आहे. बुद्धिगम्य आहे.
जे इंद्रियांना अगोचर आहे व जे सुख भोगीत असताना तो योगी आपल्या स्वल्पापासून चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभवाला येते.’ म्हणूनच त्या योगाने या इंद्रियांचे नियमन झाले की, मन स्थिर होईल. एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो त्या वेळेला मन आपल्या (चैतन्याच्या) भेटीला निघते. ते मन ज्या वेळेला विषयाला सोडून परत अंतर्मुख होते आणि आपणच आपल्या आत्मस्वरूपाला पाहते. पाहिल्याबरोबर त्यास आपल्या स्वरूपाची ओळख पटते. तेच तत्त्व ‘मी’ आहे. अशा समजुतीवर आपले मन स्थिर होते आणि मग सर्वसुखाच्या साम्राज्यावर बसते. मग आत्म्याशी समरस झाल्याने मनाचा मनपणा नाहीसा होतो. त्यानंतर दुसरे काहीच दिसत नाही. ज्याला इंद्रिय जाणत नाहीत, असे जे चैतन्यरूपी ‘मन’ स्वत:च आपण आपल्या ठिकाणी येऊन राहते. सुखाची चटक लागल्याने प्रपंचात गुंतलेले मन विषयवासनेची आठवणही काढत नाही. म्हणून मनाला योगाभ्यासाची सवय लावा. म्हणजे मन अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवत कायम स्थिर राहील. मग आतून-बाहेरून मनुष्य चांगलाच वागेल.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)