मन गोकुळ हे, व्याकुळ गिरीधर,घुमेल कधी रे बासरीचा स्वर?भाव मनीचे होतील गोपी,रस आनंद तू हे मुरलीधर ।मन हे गोकुळ झाले आहे. हृदयातील अभद्र विचार, विकार नष्ट झाले आहेत. भगवंताच्या ठिकाणी अविचल भक्ती निर्माण झाली आहे. आता त्याच्या बासरीच्या सुराची प्रतीक्षा आहे. त्याच्या साक्षात्काराची वाट बघतेय. तो नक्की होणार! त्याचे बासरीचे सूर नक्की या गोकुळात घुमणार, ही प्रतीक्षा आहे आणि जरी दीर्घकाळची आहे, तरीही यात अतीव आनंद आहे, उत्सुकता आहे, त्यातून नक्कीच सुंदर सूर बरसणार आहेत. त्याच्या बासरीचा सूर आणि मनीचे भाव, हे गोपी, हे मुरलीधरा, तू आनंद रस आहेस.मुक्तसंग मी. चित्त प्रसन्न,सारा संशय, छिन्नविछिन्न,मनात अविरत त्याचे चिंतन,येईल, येईल, देवकीनंदन.दिसेल नक्की, सुमुख मनोहर ,रेखियले जे, चित्र निरंतर,उत्कंठीत ही उमटे थरथर ,भाव मधुर हा, व्यापे अंतर ।तो आनंदमय आहे, त्याची प्रतीक्षाही तितकीच आनंदमय आहे आणि त्याच्या बासरीचा सूर घुमला की, आनंदाचे डोही आनंद तरंग होणार आहे. मी तर एक अतिसामान्य जीव. ज्ञानी लोक जे सांगतात, काही कळत नाही, पण मला आवडते श्रवणभक्ती. आवडते ऐकायला तुझे नाव, आवडते गायला तुझे नाव. त्यामुळेच भागवतातील गोपी मला पटतात, रुचतात, पण ते श्रीकृष्णाच्या रूपातील परब्रह्म. रात्रंदिन त्याचा ध्यास लागला आहे, त्याचे सूर या गोकुळात नक्की घुमणार.- शैलजा शेवडे
मन गोकुळ हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 6:04 AM