- माता अमृतानंदमयीशरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला चांगल्या विचारांच्या पोषणाची गरज असते. कोणत्या प्रकारचे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोणत्या प्रकारचे धोकादायक असते हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपला आहार ठरवायला हवा. आपण केवळ गोडच पदार्थ खाल्ले, तर आपले शरीर आजारांना बळी पडेल. त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल. मन हे विचारांचा प्रवाह असते. जर विचार नसतील, तर मन नसेल. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या विचारांबाबत जागरूक व्हायला हवे. कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते झिडकारायचे याबाबत आपण कायम सावध असले पाहिजे. पंतप्रधानांनी कायम त्यांच्या मंत्र्यांवर देखरेख करायला हवी. त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्यांना माहीत असायला हवीच, त्यांची मते आणि सूचना कितपत स्वीकारायच्या हेही माहीत असायला हवे. जर त्यांनी मंत्री म्हणेल ते सर्व ऐकले आणि फारसा सारासार विचार न करता कार्यवाही केली, तर त्यांना आपले पद गमवावे लागेल. हीच गोष्ट विचारांनाही लागू होते. विचार समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना हाताळणे अतिशय आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते विनाश करतील. शेत पिकते तिथे तण माजतातच. ते अधूनमधून मुळापासून काढून टाकले पाहिजेत. नाहीतर ते सर्व खत शोषून पिकाचा नाश करतील. मात्र, आपण पिकांना योग्य वेळेस पुरेसे पाणी आणि खत द्यायला हवे. कीटकांमुळे पिकाचा नाश होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजेत. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नकारात्मक विचार आपोआप फोफावत असतात, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मात्र, चांगल्या विचारांच्या मशागतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
मनासाठी विचारांचे पोषण गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:11 AM