- किशोर पाठक
काला म्हणजे मिश्रण. काही पदार्थ एकत्र केले की बनतो तो काला, पण त्या मिश्रणात प्रत्येक पदार्थ आपला गुणधर्म घेऊन उरतोच. त्याचं संयुग होणं हे महत्त्वाचं आहे. संयुग होणं म्हणजे एकजीव होणं. प्रत्येकाने आपला गुणधर्म विसरून एक संयुक्त घटक बनणं म्हणजे संयुग होणं. हे होताना माणूस वेगळा राहातच नाही.काल्याबद्दल सांगतात की, कृष्णाने सवंगड्यांबरोबर खूप खेळ खेळले. ते दमले. मग गोलाकार संगती बसले. सगळ्यांनी आपला खाऊ एकत्र केला. कृष्णाने त्यातही गंमत केली. कुणा एकाला आपला खाऊ वेगळा आहे, कमी प्रतीचा आहे, असे वाटू नये, म्हणून त्याने तो एकत्र केला. सर्व पदार्थांचे गुणधर्म त्यात आले. प्रत्येकाने स्वत:ची चव त्यात मिसळून टाकली. म्हणजे आता एकच चव तीही काल्याची. हा काला कालवण्यापासून झाला. कालवणे म्हणजे एकत्र करणे. हे करताना तो वेगळा नसतोच. पार कृष्ण काळापासून हा काला, गोविंदा चालूच आहे. त्यात सर्वसमानचा संदेश दिला जातो. दहीहंडी फोडणं म्हणजे दही, दूध, लोणी, तूप हे सर्व दुग्धजन्य पदार्थ एकत्र करून ते उंचावरून खाली सांडणे. एका दहीहंडीत उंची, एकता, समानता, चढ, उत्साह आणि त्यानंतर मलईचा आस्वाद सारं काही असतं. म्हणजे एका खेळात माणसं एकत्र येतात. एकमेकांच्या सोबतीने रिंगण करतात. मग एकमेकांच्या खांद्यावर एक फेरी उभी रहाते, त्यावर दुसरी त्यांच्या खांद्यावर. म्हणजे माणूस एखाद्याच्या खांद्यावर स्पष्ट उभा रहातो. असे होत होत शेवटी एकच. यातून किती संदेश जातात. म्हणजे असं की, आपण एकमेकांना धरून राहतो. एकमेकांच्या मदतीने खांद्यावर उभे राहातो. हळूहळू हे मजबूत खांदे जे तळाशी असतात, ते कमी होत जातात. कधी-कधी एक स्तर, थर उभा करताना तो खाली कोसळतोही असं होत-होत माणसं कमी होत-होत शेवटी एकटाच राहातो. म्हणजे अत्युच्च जागी एकच असतो. तो सर्वांच्या खांद्यावर उभा उसतो. याची जाणीव ठेवावी. म्हणजे आपण एरवी एकमेकांच्या खांद्यावरच उभे असतो, पण पार टोकावर गेलो की एकटेच असतो. त्याला तिथे जाणवणारं एकटेपण महत्त्वाचं असतं. ते भोगायची तयारी असेल तर वर चढ. हे एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी आणि ती ज्या सर्वांच्या मदतीने होते तो काला.