मुंबईः शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आज रात्री १०.४५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं आहे. सुमारे एक तास चंद्राची खग्रास अवस्था पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण त्याचवेळी, 'ग्रहण पाहू नये म्हणतात', असं मानणाराही मोठा वर्ग आहे. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी हा विषय येतोच आणि त्यावरून वादही होतात. म्हणूनच ग्रहणाबाबत धर्मातील श्रद्धा काय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा कसा विचार केला जातो, या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. त्यातून तुम्हाला काय पटतं, ते तुम्ही ठरवणंच अधिक योग्य.
धर्मः ग्रहणकाळात कुठलाही पदार्थ खाणं वर्ज्य मानलं जातं. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, असा समज आहे. ग्रहणकाळात खाल्ल्यास नरक भोगावा लागू शकतो, असंही काही जण मानतात.
विज्ञानः फक्त उघड्यावरच्या वस्तू खाऊ नका. शिजवलेलं अन्न खाण्यास काहीच हरकत नाही.
...........
धर्मःग्रहणकाळात घराबाहेर पडू नये. गर्भवती महिलांनी तर बाहेर जाणं निक्षून टाळावं. त्या सावलीचा गर्भातील बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विज्ञानःपूर्वीच्या काळी रस्त्यावर दिवे नसायचे. ग्रहणकाळात अंधारामुळे अपघात होण्याची भीती असायची. परंतु, आता या समज कालबाह्य ठरतो.
............
धर्मःनखं कापू नयेत, सुरी-चाकूसारख्या धारदार वस्तू वापरू नयेत.
विज्ञानः इथेही अंधाराचाच तर्क लागू पडतो. ग्रहणकाळात नखं कापल्यास काही चिरण्यासाठी-कापण्यासाठी सुरू वापरल्यास पाप वगैरे अजिबात नाही.
..............
धर्मः ग्रहणकाळात मुलाचा जन्म होणं अशुभ मानलं जातं. त्याच्या आयुष्यावर ग्रहणाचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं म्हणतात.
विज्ञानः फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग चंद्रग्रहणाच्या दिवशीच जन्माला आला होता. तो आज यशोशिखरावर विराजमान आहे.
............
आजच्या ग्रहणाचं वैशिष्ट्यः
पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे.