- विजयराज बोधनकरती आई कठोर होती. तिने मुलाला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले. स्वातंत्र्याची आणि स्व-तंत्राची गणिते सोडवायला भाग पाडले. शक्तीचे, बुद्धीचे, चातुर्याचे सर्व अध्याय तिने त्याला कोठून पाजले? आईच्या कठोर शिक्षण संस्कारामुळे मुलगा स्वत:च्या प्रेमात न पडता स्वातंत्र्याची रणनीती आखू लागला. स्वातंत्र्याचं अध्यात्म आईच्या पावलावर मस्तक ठेवून आत्मसात करू लागला. पुस्तकातलं अध्यात्म बाजूला सारून कर्माचं अध्यात्म जाणिवेच्या स्पर्शातून अनुभवू लागला. शरीर, मन, बुद्धी या निसर्गदत्त देणगीला समईतल्या ज्योतीसारखं जपू लागला. आतून मिळणाऱ्या उत्तरांवर आईसारखं प्रेम करू लागला. आजूबाजूचे पंचांगातले शकुनी त्या मुलाने कधीच पायाखाली चिरडले आणि पंचांगापेक्षा पंचमहाभुतांच्या पायावर त्याने शरणागती पत्करली. आत्मबळाची त्याला प्रचिती आली. आईच्या कठोर शिक्षणाचा अर्थ फक्त अर्थकारणासाठी, स्वार्थकारणांसाठी न वापरता राष्ट्रहिताच्या विकासासाठी विचारात घेऊ लागला. इथला प्रत्येक जीव सत्याच्या बाजूने लढला तर बलाढ्य शत्रूही हार पत्करून सत्याच्या पायावर लोळण घेईल अशी ती महान आईची शिकवण त्या मुलाने आचरणात आणली, प्रत्यक्षात उतरवली. लहान मूल हे ओली माती असते. त्याला विखारी साप बनवायचं की शांतीमय बुद्ध बनवायचं हे फक्त आईच्या हाती असतं. तिची फक्त नाळ जर शाश्वत विचारांची असेल तर शब्दांपलीकडचं अध्यात्म फक्त कृतीतून ती नक्कीच जन्मास घालू शकते. आई हा असा एक पवित्र ध्वनी आहे जो ओमकाराच्या पवित्र लहरीइतकाच सत्शील आहे. विश्वव्यापी आहे. आई हे प्रेमळ सूत्रही आहे. आई एक दिव्य शस्त्रही आहे. पण आज आईची गुणसूत्रंच बदलली आहेत. नव्या विचारांच्या स्त्रीमनाला अघोरी शक्तीने गिळंकृत केलं आहे. आईच्या विचारांची बैठकच आज चंचलतेच्या वृत्तीतून वेगवान प्रवासकर्ती बनलीय, पण ज्या आईने कठोर बनून ज्या मुलाला घडवलं तशी आई आणि तसा मुलगा आज जन्माला येऊ शकेल काय? ज्या आईने ज्या मुलाला घडवलं तिचं नाव होतं जिजाबाई आणि जिच्या पक्क्या विचारांतून ज्या मुलाने आपलं स्व-तंत्र विकसित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज! काय ते पुन्हा जन्म घेऊ शकतील? हा प्रश्न प्रत्येक होणाºया आईनेसुद्धा स्वत:ला विचारला पाहिजे. तशा आईची आज राष्ट्राला गरज आहे की जिच्यापोटी प्रखर सत्यवादी मूल जन्मास येऊ शकेल.
आईचं अध्यात्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 6:14 AM