सोलापूर : भगवान मार्कंडेय यांना सोळा वर्षांचे अल्पायुष्य लाभले़ ते सोळा वर्षांचे झाल्यानंतर माता मरुद्धती आणि पिता मृकंडऋषी हे दोघे दु:खी, कष्टी झाले़ या दु:खाचे कारण जेव्हा मार्कंडेय यांनी त्यांच्या माता-पित्यांना विचारले त्यांनी पुत्राच्या अल्पायुष्याबद्दल बोलले़ त्यांचे दु:ख नाहीसे करण्यासाठी महामुनी मार्कंडेय यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. यातून त्यांनी शंकराकडून मृत्युंजयचा वर मिळविला़ त्यांच्या तपश्चर्येतून त्यांनी माता-पिता हेच सर्वश्रेष्ठ आहेत, हे सिद्ध करून दाखवले़ माता-पित्यांच्या सेवेला त्यांनी सर्वश्रेष्ठ मानले़ त्यामुळे महामुनी मार्कंडेय हे सर्वश्रेष्ठ चिरंजीव बनले, असे विमोचन ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वर राव यांनी केले.
डॉ. कोटेश्वर राव यांचे सोलापुरात भगवान मार्कंडेय चरित्रावर प्रवचन सुरु आहे. संतोषीमाता गोशाळा आणि डॉ़ ब्रह्मश्री चागंटी कोटेश्वर राव प्रवचन समितीच्या वतीने तेलुगू प्रवचन आयोजिले आहे़ आज प्रवचनाचा पहिला दिवस होता़ पूर्व भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत तेलुगू प्रवचनास प्रारंभ झाला़ शुक्रवार, २९ नोव्हेंबरपर्यंत रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत प्रवचन सुरु राहणार आहे़ कर्णिकनगर येथील माजी खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर प्रवचनाचे उद्घाटन झाले़ गणेश बुधाराम यांच्या हस्ते पुष्पहार घालून डॉ़ चागंटी कोटेश्वर रावांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, शशिकांत केंची, प्रवचनाचे आयोजक डॉ़ राजेंद्र गाजूल, नगरसेविका श्रीकांचना यन्नम, विजया वडेपल्ली, इंदिरा कुडक्याल, प्रवचन समितीचे अध्यक्ष भूमय्या कमटम, गणेश पेनगोंडा, श्रीनिवास आरकाल, नारायण आडकी, आयलेश यल्ला, दत्तात्रय बुरा, नागनाथ पोरंडला, मल्लिकार्जुन आरकाल आदी उपस्थित होते़ उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेणू वंगा, कवयित्री रेणुका बुधाराम तसेच प्रभाकर भीमनाथ यांनी केले़
स्कंध पुराण अन् मार्कंडेय पुराण...- स्कंध पुराण, मार्कंडेय पुराण तसेच इतर धार्मिक पुराणांचा दाखला देत त्यांनी भगवान मार्कंडेय यांचे धार्मिक महत्त्व सांगितले़ महामृत्युंजय मंत्र महामुनी मार्कंडेय यांनी सार्थकी लावले़ शंकराने वरदान दिल्यानंतर त्यांची गणना सप्तचिरंजीवात झाली़ संतान प्राप्तीकरिता त्यांच्या माता-पित्याने शंकराची कठोर तपश्चर्या केली़ मार्कंडेयांच्या माता-पित्यास भगवान शंकर पावले़ त्यांना वरदान काय देऊ असे विचारले असता त्यांनी संतानप्राप्तीची याचना केली़ अल्पायुषी कीर्तीवान पुत्र देऊ की दीर्घायुषी राक्षसी पुत्र देऊ असे शंकराने विचारले़ त्यांनी कीर्तीवान पुत्राचा वर मागितला़ त्यानंतर माता मरुद्धती अािण पिता मृकंडऋषी यांच्या पोटी भगवान मार्कंडेय ऋषींचा जन्म झाला़ भगवान शंकर यांची कठोर तपश्चर्या केल्यानंतर महामुनी मार्कंडेय मृत्युंजयी बनले़