- शैलजा शेवडेमुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासीथोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवलाविंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पायमाशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली...हा मुक्ताबाईचा कुट अभंग आहे. असंभवनीय ते संभवनीय झाले. अशक्य गोष्ट झालेली आहे.‘देखोनी मुक्ताई हासली’ अशक्य कोटीतलं घडलंय जे विनोदी आहे, ते पाहून त्यांना हसू येतंय.या रचनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतील.ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अगा जे घडलेची नाही,तयाची वार्ता पुससी काई मिथ्या - अस्तित्वात नसलेल्या मायेने (मुंगीने), सूर्याला (ब्रह्म जाणिवेला/ ज्ञानाला ) गिळून टाकले असं म्हणायचं असेल का?वांझेला पुत्र झाला, विंचू पाताळात गेला आणि शेष नागाचा माथा त्याच्या पायाला नमस्कार करतो. माशी व्याली तिला घार झाली- जे भ्रामक, क्षुद्र त्यानेच आपली जाणीव संपूर्णपणे व्यापली आहे, हे पाहून त्यांना गंमत वाटते. असा अर्थ असू शकेल का?दुसरा अर्थ, एकदम याच्या उलट असू शकतो. मी सर्वव्यापक आहे. अहं ब्रह्मास्मि ही जाणीव. ही जाणीव होणे... मुंगी म्हणजे जीवात्मा आणि सूर्य म्हणजे परमात्मा, परब्रह्म. मुंगीने सूर्याला गिळणे म्हणजे जीवात्म्याच्या जाणिवेचे क्षितिज विस्तारले आहे. आत्मप्रेरणेच्या जोरावर मुंगीरूपी जीवात्म्याने ज्ञानरूपी आकाशात उड्डाण केले आणि स्वयंप्रकाशित चैतन्याला आत्मसात केले. जीवात्म्याचे अज्ञानपटल नाहीसे झाले. त्याची दृष्टी दिव्य व व्यापक बनली. त्याला आत्मस्वरूपाची ओळख पटली आणि सूर्याला गवसणी घातली. एकदा सत्याचा बोध झाला की, सगळे सोपे वाटते. मायेमुळे किंवा अज्ञानामुळे जे अवघड वाटत होते, ते ज्ञान प्राप्त झाल्यावर सोपे वाटू लागते आणि मग आपल्यालाच आपले हसू येऊ लागते...या अभंगाचा काय अर्थ असेल नेमका...?
मुंगी उडाली आकाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:55 AM