नागपंचमी. श्रीकृष्णाने कालियामर्दन केले, तो दिवस म्हणजे नागपंचमी. पूर्वीच्या काळी, नव्या नवरीसाठी माहेरी यायचा हक्काचा सण म्हणजे, नागपंचमी. मग भावाला माहेरी नेण्यास सांगण्यासाठी बहुतेक नागाला भाऊ समजून, त्याची विनवणी केली जात असावी. आणि म्हणून आदल्या दिवशी भावाचा उपास केला जातो.
आईकडून मेंदी, बांगड्या, टिकल्या, नेलपॉलिश या सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या. कारण, त्या काळी अशा गोष्टी फक्त सणाला, त्यातल्या त्यात नागपंचमीलाच मिळायच्या. मग सणाच्या दिवशी लवकर उठून, नटून थटून गावाबाहेर कुठे शेतात वारूळ असेल, तिथे पूजेला जायचं. प्रत्येक वारुळात नागोबा असतात, या श्रद्धेने पूजा केली जायची. शंकराच्या मंदिरात जायचं आणि परत गारूड्या जवळच्या नागालासुद्धा दूध-लाह्या दिल्या जायच्या. अशा सगळ्या पूजा झाल्या की, माहेरवाशिणी खेळण्यांत दंग व्हायच्या. भावांनी त्यांच्यासाठी झाडाला मोठमोठे झोके बांधून दिलेले असायचे. आपल्या भारतीय सणांचे हेच वैशिष्ट्य आहे की, इथे ठराविक गोष्ट ठराविक सणालाच केली जाते.
झोके पंचमीलाच बांधले जातात. खरं तर, नागाचं ते सळसळतं रूपच आपल्याला आकर्षित करत असतं. बत्तीस शिराळ्यातला तर नागपंचमीचा सण जगप्रसिद्ध झाला आहे. तिथल्या वातावरणामध्ये खूप साप-नाग आढळतात. तिथे ग्रामस्थ या दिवशी नाग पकडतात. दिवसभर नागांची पूजा करून संध्याकाळी त्यांना परत निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येते. यादिवशी स्त्रिया स्वयंपाकात चिरणे, कापणे, भाजणे या गोष्टी टाळतात. कारण ती भावाला नागात पाहत असते. तिच्याकडून त्याला काही अपाय होऊ नये, या श्रद्धेने ही परंपरा पडली आहे. ती आपल्या घरी श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार हे पण मोठ्या उत्साहाने साजरे करत असते. मग, तिचा भाऊ राखीपौर्णिमेच्या निमित्ताने परत एकदा भेटतो. भाऊ-बहिणीच्या गोड नात्यातला, गोड क्षण म्हणजे, भावाच्या हातावर राखी बांधणे.राखी बांधून फिरणारे, सगळे भाऊ किती सोज्वळ दिसतात नं? हाच दिवस, कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. मान्सूनमध्ये खवळलेल्या दर्याला नारळ अर्पण करून शांत करण्याची प्रथा आहे.
या दिवसानंतर ते लोक, परत मासेमारीसाठी दर्यात होड्या घालतात. मग, येते ती श्रीकृष्ण जन्माष्टमी. दिवसभर उपवास करून, मध्यरात्र बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावरच पूजा करून हा उपवास सुटत असतो. उत्तर भारतात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. असा हा कॅलेंडरमध्येसुद्धा पवित्र केशरी रंगात छापलेला पवित्र महिना. घरोघरी सत्यनारायण पूजा होत असते. बाकीची व्रतवैकल्येसुद्धा श्रद्धेने होत असतात. आणि अशा या पवित्र महिन्याचा शेवट होतो बैलपोळ्याने. फक्त शेतकरीच हा सण साजरा करत नाहीत तर, घरोघरी मातीच्या प्रतीकात्मक बैलाचे पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. काही ठिकाणी हा सण भाद्रपद महिन्यातच साजरा केला जातो. निसर्गाच्या अगदी जवळ जाणारा हा पवित्र महिना. निसर्गातल्या नाग, बैल, दर्या आदी गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आजकाल काही सणांचे स्वरूप बदलले असले तरी, सण साजरे करायचा उत्साह फक्त आपल्या भारतीयांमध्येच.-निर्मला मठपती