- प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर श्री दुर्गा सप्तशती आधुनिकसंदर्भातश्री दुर्गा सप्तशतीमध्ये कवचानंतर अर्गला स्तोत्र आलेले आहे. अर्गला म्हणजे अडसर, बाधा, अडचण. पूर्वी दरवाजाला आतून बंद केल्यावर एक लाकडाचा रॉड कडी लावल्यावर लावला जात असे, त्याला ‘आगळ’ म्हणत असत. अर्गलाचाच अपभ्रंश म्हणजे आगळ. उपासनेमध्ये साधकाला काही ना काही मागायचेच असते. सर्वसामान्य मनुष्य काम्यभावनेनेच उपासना करीत असतो. सप्तशतीतल्या कथानकाचा विचार केल्यावर त्यात असे दिसून येत की, राजा असो वा वैश्य व्यापारी, स्वर्गातील देव असो वा सामान्य यांनी आपल्या भौतिक सुखाचीच कामना महादेवीकडे केलेली दिसून येते आणि या कामनापूर्तीसाठी जी उपासना, साधना, भक्ती आहे ती करीत असताना कुठलीही बाधा अडसर, संकट येऊ नये म्हणून, तो अडसर दूर होण्यासाठी त्या महादेवीची विनवनी करीत असताना तिला रूप दे, जय दे आणि आमच्या शत्रूचा म्हणजेच अडचणींचा नाश कर, अशी आळवणी केलेली आहे. त्याबरोबरच त्या आदिशक्तीच्या प्रचंड सामर्थ्याचेही वर्णन आहेच.
आपल्या अस्तित्वासाठी, भौतिक सुखासाठीचा हा एक श्लोक पाहा ‘विद्यावन्तम् यशवन्तम् लक्ष्मीवन्तम् जनं कुरू। रूपंदेहि जयंदेहि यशोदेहि द्विषो जाहि। किंवा पुत्रान्देहि धनंदेहि सर्व कामांश्चू देहिमे ।’ या सर्व अपेक्षा, कामना आजच्या आधुनिक युगात सर्वांच्याच आहेत. मग त्यांच्या पूर्ततेसाठी जे परिश्रम करावे लागतात, येणाऱ्या अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो, त्यासाठी जे मानसिक व भावनिक बळ शक्ती असावी लागते, ती शक्ती त्या आदिचैतन्य शक्तीकडून लाभावी, प्राप्त व्हावी म्हणून ही मानसिकता त्याद्वारे निर्माण केली जाते. आम्ही सुरू केलेले कार्य, प्रकल्प, योजना, संकल्प पूर्ण व्हावेत, त्यासाठी आडवे येणारी आगळ दूर होऊन यशाचा दरवाजा आमच्यासाठी उघडावा म्हणून अर्गला स्तोत्राचे पठण आवश्यक वाटते. उपासनेसाठी म्हणूनच सुयोग्य वातावरणाची निर्मिती हेच अर्गला स्तोत्राचे महत्त्व आहे. अशी वातावरण निर्मिती आमच्या सर्वच कार्यासाठी आवश्यकच आहे. म्हणजे अर्गला स्तोत्रानंतर येते ते ‘किलक’ स्तोत्र. कील म्हणजे नोकदार, टोकदार, महादेवीच्या उपासनेची संकल्पाने सुरुवात होते. कवच स्तोत्रातून शरीर मनाची शांती आणि संरक्षणाची अपेक्षा केली जाते. अर्गला स्तोत्राच्या उपासनेसाठी सुयोग्य आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जातो.
आता किलक म्हणजे मनाची ती टोकदार, एकाग्र अवस्था ज्यामुळे ध्येयापासून विचलित न होता दृढ अंत:करणाने तंत्राबरोबरच मंत्र मनात पक्का ठसविण्याच्या क्रियेला किलक अशी संज्ञा आहे. या किलकाचे औचित्य आणि महत्त्व किलक स्तोत्रात वर्णिलेले आहे. त्यातील दोनच श्लोकांचा संदर्भ बघा. किलक स्तोत्राच्या प्रारंभीच आलेला हा श्लोक भगवान शंकराची स्तुती आहे. श्लोक असा ‘ॐ विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्य चक्षुष । श्रेय:प्राप्ती निमित्ताय नम: सोमार्द्धधारिणे।’ अर्थात, विशुद्ध ज्ञान हेच ज्याचे शरीर, तीन वेद हे ज्याचे तीन दिव्य नेत्र जे जगाच्या कल्याणाचेच कार्य करतात ज्यांनी मस्तकावर अर्धचंद्र धारण केलेला आहे. त्या भगवान शिवशंकराला आमचा नमस्कार असो.आधुनिकसंदर्भाचा विचार केल्यास आम्ही ज्या कार्याची, उद्योगाची, प्रकल्पाची सुरुवात करणार आहोत किंवा केली आहे, त्याचे विशुद्ध असे ज्ञान आम्हाला असले पाहिजे, मिळाले पाहिजे. शंकराचे दिव्य तीन नेत्र म्हणजे आमची दूरदृष्टी जी त्या कार्याचा, उद्योगाचा साधकबाधक विचार करून वर्तमान, भूत आणि भविष्य यांचा आढावा घेऊन कृत संकल्प होऊन निर्धाराने, एकाग्रतेने, आत्मविश्वासाने त्यासाठी सिद्ध असेल. दुसरा एक श्लोक पाहा.
‘ददाति प्रतिगृह्णाति, नान्यथैषा प्रसीदति । इत्थंरूपेण कीलेन, महादेवेन कीलितम’ म्हणजे अत्यंत एकचित्ताने केलेला सप्तशतीपाठ भगवान शंकरांनी स्तोत्ररूपाने बांधलेला असल्याने प्रसादरूपाने त्याची फळे मिळतात. ही देवीची कृपा साधनेशिवाय कुणालाही सहज मिळत नाही. म्हणजेच कुठलेही प्राप्य, प्रेयस, नियमानुसार, श्रद्धेने, परिश्रमाने, दृढ निर्धाराने केल्यास त्या कार्याचा प्रसादरूपी लाभ झाल्याशिवाय राहत नाही. आता सप्तशतीच्या पुढील भागात महादेवीच्या, दुर्गेच्या पराक्रमाच्या कथांचा विस्तार केलेला आहे. या कथा मार्कण्डेय पुराणातून आलेल्या आहेत. पुराणात लाक्षणिक भाषेत काही तत्त्वे सांगितलेली असतात; परंतु सामान्य माणसासाठी ते गोष्टीरूप निरूपण असते. म्हणून महादेवीच्या गोष्टीतील तत्त्व किंवा मर्म आपणास जाणून घ्यावयाचे आहे. पुराणातील कथांतून मायेची चाहूल माणसास लागते आणि मग परमेश्वराची ओळख पटणे सोपे जाते. संत गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘ज्याने माया जाणली त्याने परमेश्वराला ओळखले.’ येथे आपण महामायेला तिच्या पराक्रमातून जाणून घेण्यासाठी पौराणिक कथांना आधुनिक म्हणजे आजच्या काळाशी जोडून त्या कथांची कालसापेक्षता बघत आहोत. आदिशक्तीच्या या चरित्र कथा आजच्या काळासाठीही सुसंगतच आहेत.