प्रा. अशोक झाल्टे शास्त्री( उंडणगावकर)
श्री दुर्गा सप्तशती आधुनिक संदर्भात : या चराचरात शक्ती म्हणजे चैतन्य सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. या शक्तीशिवाय, चैतन्याशिवाय कुठलेही कार्य केवळ असंभव आहे. अगदी बोलण्यासाठीसुद्धा वाचा शक्ती असावी लागते. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ही शक्तीच कार्यरत असते आणि म्हणून आम्ही सर्व त्या शक्तीच्या अधीन आहोत. सप्तशतीच्या कवचातील नवदुर्गांचा विचार आपण करीत आहोत. त्यातली चौथी दुर्गा म्हणजे कुष्मांडा. अंड्यातून विश्व निर्माण करणारी बीजांडकोशातूनच सरींची निर्मिती होत असते. आजही आधुनिक युगात हीच प्रक्रिया कार्यरत आहे. निर्मिती केवळ जीवांचीच नव्हे, तर जे जे आम्ही शारीरिक, मानसिक बौद्धिक शक्तीच्या आधारे किंवा बळावर निर्माण करतो ती सर्व निर्मिती सृजन आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. कारण नवनिर्मिती हे निसर्गाचे नैसर्गिक कार्यच आहे, म्हणून कुष्मांडा देवीची उपासना.
५. स्कंदमाता हे दुर्गेच पाचवे रूप. शिव-पार्वतीच्या मिलनातून जो पुत्र जन्मला त्याचे नाव स्कंद. हा देवांचा सेनापती, म्हणजेच देवांचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करणारा. आज राक्षस जरी प्रत्यक्षात नसले तरी राक्षसी प्रवृत्तीचे थैमान सर्वत्र राक्षसांच्या दुष्टपणापेक्षाही प्रचंड प्रमाणात सर्वत्र व्याप्त आहे. या वाईट प्रवृत्तींपासून आमचे संरक्षण व्हावे, त्यापासून आम्ही परावृत्त व्हावे म्हणून स्कंदमातेला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणजेच आमच्या प्रवृत्तीत ज्या विकृती निर्माण होत आहेत त्याचे स्कंद मातारूपी संस्काराने निवारण होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्कंदमाता म्हणजे प्रवृत्तीतून निवृत्तीची उपासना.
६. कात्यायनी- कत वंशात जन्मलेल्या कात्यायन ऋषींकडे महिषासुराच्या जुलमामुळे त्रस्त झालेले देव गेले. त्यावेळी विखुरलेल्या सर्व देवशक्तींना एकत्रित, संघटित करून कात्यायनांनी सर्व देवांच्या शक्तीतून ज्या अतुलनीय शक्तीला निर्माण केले किंवा सर्व देवांच्या शक्तींपासून जी देवी प्रकटली ती कात्यायनी. आजही आमच्या घरातील, परिवारातील, समाजातील, राष्ट्रातील विखुरलेल्या शक्तींचे संघटन आपल्या सर्वच स्तरातील अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक झालेले आहे आणि म्हणून कात्यायनी नावाच्या दुर्गाशक्तीची उपासना आम्ही केलीच पाहिजे.
७. कालरात्री- हे दुर्गेचे सातवे रूप. यात काल म्हणजे काळ आणि रात्र म्हणजे अंधार. काळाच्या अगोदर आणि काळाच्या नंतर कुणालाच काही प्राप्त होत नसते. त्या काळासाठी वेळासाठी सर्वांनाच थांबावे लागते. काळ मात्र कुणासाठी थांबत नसतो. कधीकधी जीवनात, मनुष्य जीवनात, समाज जीवनात, राष्ट्र जीवनातही खूप चांगले निर्माण झालेले असते, जन्माला, उदयाला आलेले असते आणि अचानकपणे काळाचा घाला त्यावर पडतो आणि सगळ्यांचा नाश होतो. अशावेळी आपण त्याला काळरात्र म्हणतो. कवी सुरेश भटांनी याचे छान वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ‘उष:काल होता होता काळरात्र झाली । अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’. दुर्गेचे प्रलय काळातील हे उग्र रूप, महाभयंकर म्हणून तिला काळरात्री म्हटले आहे. सप्तशतीतल्याच रात्री सुक्तात तिचे वर्णन आहे, ते असे- ‘प्रकृतिस्त्वंच सर्वस्य गुणत्रय विभाविनी।
‘कालरात्रिर्महारात्रि र्मोहरात्रिश्च दारुणा’, अर्थात हे दुर्गे तू निसर्गाची प्रेरणा आहेस. ‘सत्त्व-रज-तम’ या तीन गुणांची स्वाभाविकता आहेस. अत्यंत दारुण अशी काळरात्री, महारात्री आणि मोहमयी रात्रीही तूच आहेस आणि म्हणून अचानकपणे काळाचा घाला पडल्यावर पुन्हा नवनिर्माणासाठी आयुष्याच्या मशाली पेटत्या ठेवणे आजही गरजेचे आहे. त्यासाठी या कालरात्री दुर्गेचे पूजन अर्चन, आराधना असावी.
८. महागौरी- हे दुर्गेचे प्रसन्न, आनंददायी, गौरवर्णी आठवे रूप. आपल्या जीवनात आपल्याला आज प्रसन्नता, आनंद, शांतता, शुद्धता, पवित्रता याची खूपच आवश्यकता, कारण सर्व भौतिक सुख साधनांची उपलब्धी, रेलचेल असूनही निराशा, उदासी, ताणतणाव, अशांतता, अतृप्ती, अपवित्रता, भ्रष्टता, रोगग्रस्तता, भांडण, कौर्य, संहार यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. महागौरी दुर्गेच्या कृपाप्रसादाने तो आनंद, चैतन्य, प्रसन्नता, पावित्र्यता, शांतता, सौख्यता आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी तिच्या या आठव्या रूपाची उपासना अत्यंत आवश्यक आहे. कारण तीच आमच्या या विकृत प्रवृत्तीतून आम्हाला निवृत्त करू शकते.
९. सिद्धिदात्री- हे दुर्गेचे नववे रूप, सिद्धी म्हणजे, अथक प्रयासातून, परिश्रमातून, अविरत कार्य सातत्यातून, कठोर उग्र साधनेतून, तपश्चर्येतून प्राप्त झालेली शक्ती. जिच्यामुळे असंभवास संभावित करण्याचे सामर्थ्य सिद्धी प्राप्त झालेल्यांत असते; परंतु सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तिचा दुरुपयोग न होता, ती सिद्धी जनकल्याणासाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. मग ती सिद्ध ी अध्यात्मातील असो की, विज्ञान तंत्रज्ञानातील, भौतिक साधनांची असो, त्यासाठी .......... सिद्धिदात्रीची उपासना. देवी कवचात या नवदुर्गेच्या वर्णनात शेवटी असे म्हटलेय की, नवमसिद्धी दात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तितिता: म्हणजे या नवदुर्गा जर प्रसन्न झाल्या, तर साधक हा कीर्तिवान होतो. प्रसिद्धीच्या या युगात त्याची कीर्ती अधिक चांगली व्हावी, यासाठी कीर्ती शब्दाला प्र हा उपसर्ग लागून प्रकीर्तितिता:, असा शब्द प्रयोग झालेला आहे. त्याचा अर्थ प्र म्हणजे अधिक प्रबळ, परिणामकारक, गतिमानता त्यात यावी, असा होतो. कारण मनुष्य प्रसिद्धीभिमुख असतो. येनकेन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषोभवेत.