- डॉ.दत्ता कोहिनकर - दामले मॅडमचा ५०वा वाढदिवस. आयुष्याभर नि:स्वार्थपणे, सेवाभावी वृत्तीने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले होते. बंगल्यावर त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो असता, त्यांनी विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याच्या स्वभावाची व नैतिक मूल्यांची खूप वाहवा केली व बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असल्याने तो आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला व एकाला लांबूनच दाखवून त्याबद्दल व्यसनी व वाया गेलेली केस, असा शेरा मारला . त्या वेळेस मी चिंतन करताना मला अमेरिकेच्या ३२व्या अध्यक्षाची अर्थात फ्रेंकलिन रुझवेल्ट यांची आठवण झाली. जो वाईट राजकारणी, गुंड यांच्या संपर्कात असायचा, दररोज सिगारेट व दारू प्यायचा व ज्योतिष्यांचा वारंवार सल्ला घ्यायचा. एकंदरीत, मवाली प्रतिमा. त्याला दोन बायका होत्या; परंतु उच्च पदावर त्याने महत्तम कार्य करून दाखविले. इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल कॉलेजमध्ये अफीम वापरायचा, दररोज खूप प्यायचा, अहंकारी होता, त्याने पंतप्रधानपद भूषवून महत्त्वपूर्ण काम केले व जो संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, बायकोशी प्रमाणिक, उत्कृष्ट चित्रकार, कष्टाला प्रधान्य देणारा अॅडॉल्फ हिटलर ज्याने लाखो ज्यू लोकांची कठोर पद्धतीने हत्या केली. या चिंतनानंतर लोकांच्या दर्शनी भागावरून, सवयीवरून त्यांच्याबद्दल अनुमान काढण्याचा फोलपणा मला लक्षात आला व समजले- तुम्ही कोणालाच पूर्णत: ओळखू शकत नाही. खरोखर मित्रांनो, प्रत्येक जण हा आपापल्या बुद्धीनुसार, आलेल्या अनुभवानुसार, परिस्थितीनुसार, कुवतीनुसार समोरच्यांना पाहत असतो; पण ते अंतिम सत्य असतेच असे नाही. एका बाईला नेहमी वाटायचे, की समोरच्या फ्लॅटमधील स्त्रीचा पती पत्नीची खूप काळजी घेणारा आहे. कारण तिने २ वेळा त्याला कारबाहेर उतरून पत्नीचा दरवाजा उघडताना पाहिले होते. नंतर एका मैत्रिणीने सांगितले, की त्याच्या कारच्या दरवाजात बिघाड झाला आहे, तो आतून उघडत नाही. एक बाई समोरच्या मैदानावर तीन मुलांना खेळताना पाहून विचार करत दु:खी झाली. कारण तिला एकच मुलगा होता. कालांतराने तिला कळले, की त्या घरातल्या तीन मुलांपैकी दोन मुले ही त्या कुटुंबाने दत्तक घेतली असून त्यांचा स्वत:चा एक मुलगा हा कॅन्सरग्रस्त आहे. मित्रांनो, तुम्ही काय बघता, काय अनुमान काढता, काय विचार करता यापेक्षा सत्य परिस्थिती काही वेगळीच असते. त्यामुळे कुणालाही कमीजास्त लेखू नका. प्रत्येक माणूस हा देवाची निर्मिती आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करा. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून समोरच्या व्यक्तीला पाहत असतो. प्रत्येक जण खत:ला आलेल्या अनुभवातून दुसऱ्याविषयी अंदाज बांधत असतो. प्रत्येकाचा माईंडसेट वेगळा असतो. त्यामुळे समोरच्याला ओळखण्यात चूक होऊ शकते. आणि प्रत्येक माणसाला आपल्याबद्दलची माहीती त्याला स्वत:लाच माहीत असते. मनुष्य चांगल्या गोष्टी बाहेर शेअर करतो; पण बरेचसे तो झाकून ठेवत असतो. म्हणून कोणीही कोणाला पूर्ण ओळखू शकत नाही. एखाद्याची भारदस्त कार आपण पाहतो; पण त्याच्यावर असलेले कर्ज आपणास दिसत नाही. म्हणून एखाद्याच्या बाह्यरूपावर जाऊन निर्णय घेऊ नका. (लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)
दिसते तसे नसते!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 9:37 PM