- शैलजा शेवडेओंकारस्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो...हे गाणे नेहमी गणेशोत्सवात सुरुवातीलाच लावले जाते. हे गाणे ऐकताना नेहमी प्रश्न पडतो, हे गाणे नेमकं कुणाला उद्देशून आहे, गणपतीला की सद्गुरूंना...त्याचे उत्तर सापडले, ज्ञानदेवांनी शब्दब्रह्म गणेशाचे वर्णन केले आहे. एका ठिकाणी ‘अंतर्यामीचा गुरू गणेश आहे, असे पुढे गुरूचे वर्णन करणाऱ्या ओव्यांमध्ये ओवी आहे. ‘मज हृदयी सद्गुरू’ असे ते म्हणतात.ज्ञानेश्वरांनी १७व्या अध्यायाच्या नमनात म्हटले आहे, श्रीगणेश हे सर्व गणांचे अधिपती आहेत. ते जेव्हा योगनिद्रेत मग्न होतात, तेव्हा माया कार्यरत होऊन विघ्नांचा आभास होऊ लागतो, पण जेव्हा ते योगनिद्रेतून जागे होतात, तेव्हा संपूर्ण विश्वाचा आभास मावळून त्या जागी आत्मज्ञानाचाच प्रकाश शिष्याला जाणवू लागतो. म्हणजे जेव्हा शिष्यांवर सदगुरूंची अनुग्रह कृपा होते, तेव्हा त्याला तोवर सत्य वाटत असलेला प्रपंच खोटा असल्याचे आपोआप जाणवू लागते आणि त्याचे मूळचे आत्मज्ञान प्रकट होऊ लागते.श्रीमाउली ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात श्रीसद्गुरूंच्या अनुग्रह गणेशांचा उल्लेख करतात.अहो सदगुरुराया, तुमचा अनुग्रहरूपी गणेश ज्याला आपला प्रसाद देईल, ज्याच्यावर प्रसन्न कृपाअनुग्रह होईल, त्या बालकालाही सारस्वतामध्ये, ज्ञानसागरामध्ये सहज प्रवेश मिळेल. इथे श्रीगुरूंच्या गणेशरूपाचा माउली मुद्दामच उल्लेख करीत आहेत. सूर्याचा किरण जसा सूर्यासारखा तेजस्वीच असतो, तसा प्रत्येक जीव हा भगवंतांसारखा आनंदमयच आहे़
ओंकारस्वरूपा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 4:57 AM