- प्रा. डॉ. संदीप पांडुरंग ताटेवार
समाजात आज दान करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील अनेक देवस्थानात मोठया प्रमाणात दान करण्याकरिता भक्तगण उत्सुक असतात. मानवी जीवनात दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आजकाल अवयव दानाचे सुद्धा महत्व वाढले आहे. मृत्यू नंतर आपल्या अवयवाचे दान करून गरजूला आपण जीवन दान देवू शकतो. आंधळ्याला दृष्टी देऊन जग दाखवू शकतो तर मरणोत्तर अवस्थेत असलेल्याचे प्राण वाचवू शकतो. किती मोठे दान ! मात्र दान हे कोणतीही अपेक्षा न ठेवता करायला पाहिजे. अपेक्षेने दु:ख निर्माण होते तर निरपेक्षभावनेने सुख निर्माण होते. याबाबत एक सुंदर कथा आहे. रहीम हे नावाजलेले फार दानशूर व्यक्ती होते. त्यांचे एक वैशिष्टय होते की जेव्हा ते दान देण्यासाठी हात पुढे करायचे तेव्हा त्यांची नजर खाली झुकायची व चेह-यावरचे भाव उडून जायचे. लोकांना ही गोष्ट फार विचित्र वाटायची की हा कसा दानशूर व्यक्ती आहे की ज्याला दान देतांना अभिमान वाटण्या ऐवजी दोषी असल्यासारखे वाटते. ही गोष्ट जेव्हा संत तुलसीदास यांच्या पर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी चार पंक्ती रहीम यांना लिहून पाठविल्या. त्या म्हणजे,
ऐसी देनी देन जु, कित सिखे हो सेन |
ज्यो ज्यो कर ऊचौ करै, त्यो त्यो नीचे नैन ||
यावर रहीमने पाठविलेले उत्तर असे आहे,
देनहार कोई ओर है, भेजत जो दिन रैन |
लोग भरम हम पर करौ, तासौ नीचे नैन ||
याचाच अर्थ असा की, धन देणारा मी नाही आहे तर साक्षात भगवान आहे. तो दिवस रात्र माझ्याकडे धन पाठवीत आहे व त्याच्या कृपेने मला धन मिळत आहे परंतु लोकांना वाटत आहे की रहीम धन वाटत आहे. या विचारांनी मला दोषी असल्यासारखे वाटते म्हणुन माझी नजर व डोळे दोन्ही झुकतात. यालाच म्हणतात खरी दानत्व वृत्ती ! विं.दा. करंदीकर यांनी “देणा-याने देत जावे” या कवितेत दातृत्वाची महती कथन केली आहे. ते म्हणतात,
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...
विंदानी म्हटल्या प्रमाणे खरा दानशूर व्यक्ती देता देता शेवटी आपले हात ही देण्यासाठी तयार असतो. दाना मध्ये जाहिरात नको, प्रशंसा नको व कोणतीही अपेक्षा नको. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला सुद्धा कळायला नको, हेच गुप्त दान, हेच खरे दान व हेच पवित्र दान. अशांत मनाला शांत करणे, खचलेल्याला आधार देणे, भुकेल्याला अन्न देणे, सामाजिक बांधिलकी जपणे हा सुद्धा एक दानाचाच प्रकार अशा या दातृत्वाला आम्ही झुकून सलाम करायलाच पाहिजे !!