- सदगुरू श्री|वामनराव पै
ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ
आपल्या हिंदु धर्मात एक बरे आहे. तुला पारायण करायचे तर तु ते कर.तुला प्रार्थना करायची तर तू ती कर. भजन कर,अभिषेक कर,तीर्थयात्रा कर असे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करु शकता. सांगायचा मुद्दा असा की भगवतगीता पाठ करण्यापेक्षा त्यातला एक श्लोक घ्या व त्याचा अर्थ नीट समजून घ्या.तसेच तो लोकांना देखील नीट समजून सांगा.धर्म म्हणजे उपासनेचा एक मार्ग.माझ्या धर्मात आलात तर तुम्ही पुण्यवान व तुमच्या धर्मातच राहिलात तर तम्ही पापी असे कशाला. असे कोणी सांगितले.कोणत्या देवाने येऊन लोकांना असे सांगितले? खरंतर असे सांगणारे मुर्ख व असे चुकीचे ऐकणारे देखील मुर्ख.मी तर नेहमी म्हणतो जग हे वेडयांचा बाजार आहे व या वेडयांच्या बाजारात लोकांना कसे सुख मिळणार.समजा घरात एक वेडा असेल तर घरातल्या लोकांना जगणे कठीण होते.मग जर जगात असे बहुसंख्य लोक वेडे असतील तर हे जग कसे सुखी होणार.जीवनविद्या काय सांगते, “तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू दया या धारणेला खरा धर्म असे म्हणतात.या धर्माचे पालन करायचे की अधर्माचे पालन करायचे हे आता तुझे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.सांगायचा मुद्दा असा, आपल्या दु:खाचे मूळ जे आहे ते अज्ञान आहे आणि ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ आहे.अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कितीही विज्ञानाची प्रगती केली तरी मानवजात सुखी होणे शक्य नाही.अनेक उपाययोजना केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही व होणार नाही.अज्ञान हे आपल्या दु:खाचे मूळ आहे ते मूळ काढून टाकत नाही तोपर्यंत सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे अशीच परिस्थिती असणार व तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच होत रहाणार.जगात देव सर्वत्र भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय होई शकेल पण जगात सर्वत्र दु:ख भरलेले आहे हे मात्र वादातीत आहे याचे कारण अखिल मानवजाती मध्ये अज्ञान भरलेले आहे व हे अज्ञानच मानवजातीच्या दु:खाला कारणीभूत आहे.आपण मानव जरी निरनिराळे असलो तरी माणूस म्हणून एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे. धर्म,जात,पंथ,वेश,राष्ट्र या दृष्टीने आपण सगळे विभागले गेलेलो असलो तरी आपण एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे.माणसांची ही अशी विभागणी झालेली असली तरी ती काल्पनिक आहे.हयाला वास्तवतेचा बेस नाही. ही काल्पनिक आहे.मी काय म्हणतो ते समजावून सांगतो. मूल जन्माला येते तेव्हा त्याला जात धर्म कुळ गोत्र असे काही नसते.त्याला या सर्व गोष्टी समाजातून चिकटवल्या जातात.मी हयाला चिकटवणे म्हणतो. कारण त्याला त्याचा काहीच पत्ता नसतो.सांगायचा मुद्दा असा की मानवजात ही विभागलेली गेलेली असून व ही विभागणी काल्पनिक आहे.