- विजयराज बोधनकरसंयम आणि शांती ही मानवी जगण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाड. बिजातून जन्म घेताना आणि नकळत विस्तारत जाताना त्याच्या वाढत्या पसाऱ्याचा कुणालाही अंदाजसुद्धा येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बहरण्याचा काळ येत असतो.त्या त्या काळात तो तो माणूस बहरत जातो. यशाच्या पायऱ्या चढत जातो आणि संयम शांतीच्या मार्गावरच त्याचा प्रवासही सर्वांना सुखावह वाटत असतो. शांती आणि संयमाच्या दोरीलाच यशाच्या चाव्या बांधलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो. ज्ञानाच्या जाणिवेच्या परिक्रमेचासुद्धा एक कालावधी असतो. पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या बहरण्याचा कालावधी नियतीने ठरवून दिला आहे. म्हणून तर कुठल्याही नोकरीत अनुभवाच्या व्याप्तीनंतरच बढती मिळत जाते. कुठल्याही विषयाचे कौशल्य एकाएकी मिळत नसते. त्यासाठी संयमाने ज्ञानाचे ग्रहण करावे लागते़ जाणीव नावाची गोष्टसुद्धा फक्त पुस्तकी ज्ञानाचेच प्राप्त होत नसते. आजच्या तरुणाला प्रगतीसाठी संयम आणि शांतीची गरज आहे. यश मिळविण्यासाठी उमेदीच्या काळात तरी शॉर्टकट शोधू नये. जितका प्रदीर्घ प्रवास तितकी जाणिवेची श्रीमंती वाढताना दिसते. त्या त्या क्षेत्राच्या कालमर्यादेतच यश प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि त्याचमुळे क्षेत्र असो कुटुंब असो त्यावर संयमाचा आणि शांतीचा आशीर्वाद असेल तर सुंदर जग आपल्या मुठीत आनंदाने यायला तयार असते़ तोच खरा सुखकारक जीवनप्रवास असतो.
संयमाचा आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 5:07 AM