अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, मी पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खºया आत्मज्ञानी संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्या भारतात तर अशा आत्मज्ञानी संतांची अखंड परंपरा आहे. पण त्यांच्या उपदेशांचा अर्थ समजावून देणारे आत्मज्ञानी गुरू आज दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा आमच्या हाती ग्रंथरूपाने असूनही त्यांच्या खºया अर्थाला आम्ही कधीच प्राप्त होत नाही; कारण ग्रंथात जे रहस्य लपले आहे ते केवळ ग्रंथ वाचून, पारायण करून किंवा प्रवचने ऐकून ते रहस्य आपल्याला प्राप्त होत नसते. त्यासाठी आपल्या अहंकाराचे, मी पणाचे, तसेच विविध संस्कारांचे विसर्जन होणे गरजेचे असते. त्या शिवाय सत्याचे कधीच आकलन होत नाही.
आज आपण माहितीला ज्ञान समजतो आहोत. वास्तविक इतकी दुदैर्वाची परिस्थिती भारतात कधीच नव्हती. आज आत्मज्ञानी गुरूंचे गुरूकुल नष्ट झाले आहे. आज सर्वत्र तमोगुणाचे प्राबल्य झाले आहे, रजोगुणाचेही मोठ्या प्रमाणात संवर्धन झाले आहे, तर सत्वगुण अत्यंत अशक्त झाला आहे.
शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असतात. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फिरकत नाही. इतकेच नाही, तर तुम्ही तमोगुणी असाल तर आत्मज्ञानी गुरूंच्या जवळपास जाण्याचीही बुद्धी तुम्हाला होत नाही, ही १०० टक्के खरी गोष्ट आहे़ आज तर रजोगुण, तमोगुणालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. - ह.भ.प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर