- धर्मराज हल्लाळे
कुराणमधील अध्याय ५५ सूरह अर रहमानमधील आयत ९ मध्ये म्हटले आहे, ‘न्यायपूर्ण रितीने ठीकठीक वजन करा आणि तराजुने तोलताना वजन कमी करू नका.’ अर्थात व्यवहारात आणि जीवनात आपली उक्ती जशी, तशी कृती असली पाहिजे. आपले वर्तन न्यायपूर्ण असले पाहिजे. जे दूसऱ्याला द्यायचे आहे किंबहुना जे काही समोरच्याचे आहे त्याला देताना ठीकठीक वजन करा. तोलताना वजन कमी करू नका. म्हणजेच समोरच्याच्या वाट्याचे त्याला सर्वार्थाने दिले पाहिजे.
मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते. सातत्यानेच सद्गुणांचा पुरस्कार केला जातो. तरीही माणूस स्वार्थाच्या अवतीभोवती फिरतो. स्वत:ला अधिकचे मिळाले पाहिजे आणि दुसऱ्याला देताना कमी दिले पाहिजे, ही सामान्य वृत्ती सामान्य माणसांमध्ये असते. त्या वृत्तीला रोखणारा विचार कुराणने दिला आहे. आयातीमध्ये जे नमूद केले आहे ते केवळ व्यापार आणि व्यवहाराच्या दृष्टीने नाही. एकूणच मानवी स्वभावाला सद्वर्तनाकडे घेऊन जाणारे भाष्य केले आहे. नक्कीच आपला व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे. त्याच्यात खोट नसावी. लुबाडणूक नसावी. अगदी त्याच प्रमाणे आपल्या स्वभावातही इतराचे वाईट व्हावे हे नसावे. वस्तू देणे असो की ज्ञान देणे असो, ते तोलताना कमी तोलू नये. ज्याचा-त्याचा हिस्सा त्याला मिळाला पाहिजे. तिथे स्वार्थ आड येऊ नये. जो न्याय आपल्याला हवा आहे तोच इतरांनाही दिला जावा, ही भावना असली पाहिजे.
मानवी स्वभाव स्वार्थाने पछाडलेला आहे. ज्यामुळे समोरच्याला देताना वजन कमी करण्याची वृत्ती बळावते. परिणामी आपण न्याय करत नाही अर्थात आपल्याकडून अन्याय होतो. जो ईश्वराला अमान्य आहे. आपणाला मिळालेली कोणतीही भूमिका असो ती प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. व्यापारी असाल तर शब्दश: तराजूतील धान्य योग्यच रित्या मोजले पाहिजे़ शिक्षक असाल तर योग्य स्वरूपात ज्ञानदान केले पाहिजे. कुटुंब प्रमुख असाल की गाव प्रमुख असाल तुमचा व्यवहार हा तराजूच्या काट्यावर सर्वांसाठी समान आणि योग्यपणे जोखणारा पाहिजे. अगदी रक्ताचे नाते असो की मित्रत्वाचे नाते ते तराजूच्या काट्याइतकेच काटेकोर असले पाहिजे. अर्थात कोणाच्याही पारड्यात अन्यायाचे ओझे जाणार नाही, ही काळजी घेणाराच खऱ्या अर्थाने अध्यात्म जाणतो.