लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे. पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळे पितरांचे पूजन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ‘पितृपक्ष’ाला आरंभ होतो. त्याची पूर्णता पंधरा दिवसानंतर ‘पितृमोक्ष अमावस्येला’ होते. या पितृपक्षात आपल्या पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण, पूजन, श्राध्द, तर्पण, जप, तप, लोक करतात. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक उत्सव म्हणजेच पितृपक्ष होय. ज्याच्या कुळात आपला जन्म झाला, ज्यांच्या पुण्याईने, आशीवार्दाने आपणाला जीवनात सर्व प्राप्त झालं, अशी धारणा असलेले लोक या कालावधीत पितरांच्या स्मरणाला आणि दान धर्माला अधिक महत्व देतात. पितृपक्षात बिहार राज्यातील श्री क्षेत्र गया येथे आपल्या पितरांचे श्राध्द करण्याची पुरातन परंपरा आहे. त्यामुळे शास्त्राला मानणारे लोक पितृपक्षात गया येथे जाऊन श्राध्द, तर्पण, दान, जप, तप करतात. तर काही जाणकार आपल्या मात्यापित्याच्या दिवंगत झाल्याच्या तिथीवर श्राध्दादि कर्म करतात. धर्मराज युधिष्ठिाराने पितृशांतीसाठी ‘राजसूत्र’ यज्ञ तर ईश्वाकुवंशीय भगीरथाने घोर तप केले होते. त्याचप्रमाणे संपाति नावाच्या गिधाडान समु्रद जलाने आपल्या भावासाठी तर्पण केल्याचा उल्लेख शास्त्रात आहे. शास्त्रात पितृपक्षाचे अन्यय साधारण महत्व सांगितले आहे.
‘सर्व तिर्थमयी माता
सर्वदेव मय पिता
मातरं पितरं तस्मात
सर्व यत्नेन पूजयेत’
या ओळीतूनच पितरांचे महत्व विषद होत असून, माउली ज्ञानेश्वर महाराजांनी ‘मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे’ म्हणजेच अंतकरणातील सद्भाव सत्कर्मातून प्रगट होत असल्याचा असा माउलींनी केला आहे. तर ‘सर्व प्रयत्नेन पूज्येत पितर सदा’ असा उपदेश गरूड पुरणाचा आहे.
गया येथे होतात एकाचवेळी लाखावर श्राध्द!
पितरांच्या ऋणाईतून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नरत असतो. शास्त्रामध्ये श्री गयातीर्थ (बिहार)येथील श्राध्दाला ‘सूवर्णयोग’ असे वर्णन केले आहे. पितृपक्षात गया येथे एकाचवेळी लाखावर लोक येथे आपल्या पितरांचे श्राध्द करतात. याच कालावधीत याठिकाणी ‘पितरश्राध्द मेला’ देखील भरतो.
पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही. पितरांच्या शांतीसाठी मनुष्याने पितृपक्षात यथामती, यथाशक्ती कर्तव्य करावे. सत्कर्माने सदगति मिळते. दृष्कर्माने अधोगति होते. त्यामुळे नेहमी सत्कर्माचीच कास धरावी. शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. मात्र, चांगल्या कार्याची सुरूवात करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही.
- प.पू. शंकरजी महाराज, मठाधिपती, जागृतीपीठ-शेलोडी-तपोवन-सजनपुरी, ता. खामगाव.