- संत साहित्याचे आणि संत विचारांचे महत्त्व मनुष्य जीवनात आहे. ‘दुर्लभम् मनुष्य देहो...’, अशी एक भूमिका संत महात्म्यांनी आणि रचनाकारांनी अनेक ठिकाणी मांडली आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनीही जीवन उन्नत करणारे विचार मांडले आहेत. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, ‘साधू संत संग्रह या देवाच्या अनुग्रहासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. मनुष्यत्व, मोक्षत्व, महापुरुष संचया. महापुरुषांचा असणारा आश्रय किंवा महापुरुषांची असलेली संगती. या तीन गोष्टी शास्त्रकारांनी अत्यंत दुर्लभ मानल्या आहेत. यातील प्रथम क्रमांक जर कोणता आहे, तो मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यजन्माचा आहे.खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे. अर्थात ही देवदुर्लभ बाब आहे. मानवी जीवन मिळून मला परमात्मा पाहिजे, देव पाहिजे अशा स्वरूपाची आणि तीव्र स्वरूपाची लालसा, अंत:करणात असणे याला मोक्षत्व म्हणतात. मानवी जीवन आणि मोक्षत्व परिपूर्ण करण्याचा संत-महात्म्यांचा समागम, या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. नंतरच्या दोन गोष्टी आपण जरी दूर ठेवल्या तरी प्रथम क्रमांक त्यांनी मनुष्यत्वास दिला आहे. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे, आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे, त्या आयुष्यात आपणास सचिदानंद पदापर्यंत पोहोचता आले पाहिजे. ही लालसा जीवन उद्धारक आहे. जुने कीर्तनकार किंवा जुने संप्रदायिक विचारवंत जीवनाविषयी एक चिंतन नेहमी मांडत असत. मानवी जन्म, मानवी देह, देवलोकांना मिळाला नाही, पण मानवी देहाचे महत्त्व त्यांना कळाले. परंतु पशू, पक्षी यांना मानवी देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. पण मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ज्याना देह मिळाला; पण कळाला नाही, ते कळून देण्यासाठी संत साहित्य किंवा शास्त्र आहे. संत साहित्य आणि संतांचे विचार हे जीवनास पुढे नेणारे असतात. प्रगती करणारे असतात. अर्थात जीवनाविषयीची ही चर्चा आजच नाही तर किंबहुना युगानुयुगे ही चर्चा सुरू आहे. देह हे परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन आहे.
(हभप चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) ......