- बा.भो. शास्त्रीश्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं. पक्वान्नात सहाच रस. शब्दांत शांत रसासह दहा रस आहेत. ईश्वराच्या शब्दांत ब्रह्मरस असतो. त्याच्या शब्दांना शब्दब्रह्म म्हणतात. डाळिंबाच्या दाण्यासारखे ते परास्पर्शित असतात. शब्दरसवत्तेने ओथंबलेले शब्द देवपूजेला चालतात. ते फुलांसारखे व वज्राहून कठोर असतात. शब्दांना गंध-सुगंध आहे. त्यात आग आहे. प्रेम आहे. शब्द हे पदार्थासारखे कडू, आंबट, खारट, तिखट असतात. ते रुक्ष असतात. दक्ष असतात. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स व अद्भुत रसांचे पाट काव्यातून वाहत असतात. तर हे काव्यही समर्थ शब्दांच्या मदतीनेच तयार झालेलं असतं.स्वामी गद्यातून बोलले व संत ज्ञानेश्वर महाराज पद्यातून बोलले. हे त्यांचं मराठीतल्या सामर्थ्यावर प्रेम आहे. ‘भाषा कशी असावी याचं उत्तर ज्ञानेश्वरसारखी असावी असं आहे. तर भाषा कशी होती याचं उत्तर लीळाचरित्रासारखी होती’ एका साहित्यिकाचं हे वाक्य बरोबर आहे. स्वामींच्याच मुखातलं आणि शोधनीच्या पाठातलं, ‘शब्दी सामर्थ्य आती’ हे आजचं सूत्र आहे. शब्दसृष्टी ही मानव सृष्टीसारखीच असते. शब्दांचेही स्वभाव भिन्न असतात. शब्द चांगले व वाईट पण आहेत. एका ब्राह्मणाला पाच विधवा मुली असतात. गाव त्याला त्रास देतं. ‘या पंचरांडा, जा पंचरांडा’ या शब्दांनी संबोधतं. चांगल्या मुलींवर आळच घेतं. तो दु:खाने जळत असतो. तो स्वामींच्या भेटीला गेला. स्वामी म्हणाले, ‘या पंचगंगा हो’ तो प्रसन्न झाला व म्हणाला, ‘निवालाजी निवाला.’ स्वामी म्हणाले, तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत. गंगा शब्दाने जळत्या ब्राह्मणाचं दु:ख विझलं. त्याने वापरलेला ‘निवालाजी’ हा शब्द किती अर्थपूर्ण आहे. आधी शब्दांनी जळाला व आता शब्दांच्या थंडाव्याने निवाला. म्हणूनच शब्द जपून वापरायचे असतात.
शब्दी सामर्थ्य आती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:59 AM