संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. त्यांची सिद्धावस्था व व्यवहार स्वत:तच पाहावयास मिळतात. अशा माहात्म्यांच्या दर्शनाने व शक्तीने ईश तत्त्वाची ओळख होते. तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुणरूपाने दर्शन देतो. त्याच्या दर्शनाने कृतार्थता वाटून अंत:करणात आनंदाचा पूर येतो. आपल्या अंगावर रोमांच उभे राहातात. आत्मानंदाने मन न्हाऊन निघते. मागील जन्माचे पुण्य मिळवून या जन्मी त्या ईश्वतत्त्वाचा साक्षात्कार घडला. तेव्हा त्याचे दु:ख, चिंता दूर होते. तो देहभान व तहान-भूक विसरून जातो. अंत:करणात प्रेमाचा झरा अखंड वाहत असतो. आनंद व प्रेमाला उधाण येते. सहगुणांची खाण तयार होते. स्वार्थ व स्वार्थमूलक हे दुर्गुण नाहीसे होतात व त्यांच्या जागी दया, त्याग, सहानुभूती, शांती-क्षमा अशा सद्गुणांची वाढ होते. जणूकाही त्याच्या प्रेमानंदाला पूर येऊन स्वच्छंदी मस्तीत ते मग्न असतात. म्हणजे प्रेमळ मातेला अमृताचा पान्हा फुटला असे समजावे. त्याच्या आनंदाला सागराची उपमाही कमी पडेल. त्याचा सदासर्वकाळ सुकाळ असून, त्यापासून त्याला नवे समाधान लाभते.
‘जिव्हे अमृतचि स्वये’ असे म्हणावेसे वाटते. साक्षात्कारी संतांना अमृताचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या मनात नामचिंतनाचा व प्रेमाचा प्रवाह अखंडितपणे चालू असतो. ब्रह्मानंदाचे भरते त्यांच्या मनात असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, प्रेमाने प्रेमाचे विरजन घालून घुसळलेले लोणी म्हणजे नवनीत होय. हे नवनीत म्हणजे ब्रह्मानंदाचे पारणे होय. यामुळे अंत:करण स्थिर होऊन आत्मप्रचिती येते. आत्मप्रचिती आली की अंगावर रोमांच उभे राहातात. डोळे रक्तवर्ण होतात. कंठात प्रेम दाटून येते. डोळ्यात आनंदाश्रू येतात. जणूकाही साक्षात्काराने जीवनच बदलून जाते. चित्त स्वरूप दर्शनाने सुखावून जाते. मी -मीमध्ये मिसळून जातो. थोडक्यात ब्रह्मस्वरूपात विलीन होता येते. चित्त स्थिर होते. जीवरूपी सुखाला ब्रह्मांड सुखाची अनुभूती मिळते. या सर्वांना कारणीभूत ठरणारे मनुष्याचे मन महत्त्वाचे असते. मनाने मनाला जिंकणे म्हणजे ब्रह्मानुभूती मिळणे होय.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)