इस्लाममध्ये ईश्वरनिष्ठा आणि इमानला मूलतत्त्वांमध्ये केंद्रस्थानी मानण्यात आले आहे. दिवसातून पाचवेळा नमाज पठण करणे इमानचे प्रतीक समजले जाते. या नमाजची सुरुवात कधी झाली याचा मोठा इतिहास आहे. विस्तारभयास्तव तो इतिहास इथे मांडणे शक्य नाही.
इस्लाम धर्मात वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना सांगितलेल्या आहेत. त्यापैकी नमाज ही एक उपासना आहे. ज्याचा इबादत या प्रार्थनाश्रेणीत समावेश होतो. ‘नमाज’ म्हणून ज्या प्रार्थनाविधीचा उल्लेख केला जातो, त्याला अरबी भाषेत ‘सलात’ अशी संज्ञा आहे. कुराणात ‘सलात’ शब्द अनेकदा आलेला आहे. खाली वाकणे, भूमीवर डोके टेकवून प्रणाम करणे आणि कुरआनच्या ऋचांचे पठण करणे ही नमाजची तीन प्रमुख अंगे होत. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने यथासमय नमाज पढलीच पाहिजे. नमाज प्रत्येक मुस्लीम व्यक्तीस अनिवार्य आहे. दैनंदिन नमाजप्रमाणेच आपत्कालीन, साप्ताहिक व नैमित्तिक नमाजही सांगितलेली आहे.
मात्र नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानचे महत्त्व आणि त्याचे स्वरुप याविषयी आपण चर्चा करुयात. प्रेषितांनी इस्लाम आणि प्रेषितत्वाची घोषणा केल्यानंतर काही विश्वासू आणि प्रेषितांवर प्रेम करणाºया त्यांच्या सहकाºयांनी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषितत्वाची घोषणा झाल्यानंतर मक्केत मुस्लिमांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यानंतर प्रेषितांनी मक्का येथून प्रचंड हालअपेष्टा सहन करत मदिनेकडे स्थलांतर केले. मदिना येथे गेल्यानंतर प्रेषितांना आणि मुस्लिमांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा मशिदची उभारणी करण्यात आली. आणि पाचवेळच्या नमाजसाठी मशिदीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर लोकांना नमाजसाठी कसे बोलवायचे यावर बराच ऊहापोह करण्यात आला. तेव्हा चर्चेअंती अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हबशी गुलाम राहिलेल्या हजरत बिलाल यांना प्रेषितांनी अजान देण्यास सांगितले. त्या अजानचे शब्द आणि त्याचा अर्थ असा होता.
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर (अल्लाह महानतम आहे.) अश्हदु अल्ला इलहा इलल्लाह (मी ग्वाही देतो की, अल्लाह एक आहे.)अश्हदु अन्ना मुहम्मद अर रसुलुल्लाह (मी साक्ष देतो , की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. )हय्य अलसल्लाह, हय्या अलसल्लाह (नमाजकडे या)हय्य अलल्फलाह , हय्या अल्लफलाह (समृद्धी व सफलतेकडे या)अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाह इलल्लाह (अल्लाह महानतम आहे. अल्लाह महानतम आहे. अल्लाहखेरीज कोणीही र्ईश्वर नाही.) सकाळी पठण केल्या जाणाºया पहिल्या नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानमध्ये ‘अस्सलातु खैरउम मिन नौम’ (निद्रेपेक्षा नमाज उत्तम आहे.) हे शब्द सम्मिलीत केले जातात.
प्रेषित मोहम्मद (स.) हे मक्कावासीयांच्या छळाला कंटाळून मदिना शहरात आले. त्यानंतर काही दिवसातच तिथे इस्लाम धर्माच्या इतिहासातील पहिली मसजिद बांधली. ती मसजिद बांधल्यानंतर प्रेषितांनी हजरत बिलाल यांना अजान देण्यास सांगितले. ही अजान इस्लामच्या इतिहासातील पहिली अजान मानली जाते. हजरत बिलाल हे निग्रो गुलाम होते. प्रेषितांच्या सहकाºयांनी बिलाल यांच्या मालकाला त्यांचे मूल्य देऊन स्वातंत्र्य प्रदान केले होते. इस्लामी समतेचा विचार मांडताना अनेक अभ्यासक या घटनेचा उल्लेख करतात. वर्णव्यवस्थेत गुरफटलेल्या अरबी समाज जीवनात ही एक प्रकारची क्रांती होती. प्रेषितांनी केलेल्या या वर्णभेदविरोधी क्रांतीमुळेच आज अरबस्तानात समता प्रस्थापित होऊ शकली, हे वास्तव आहे. -आसिफ इक्बाल