- डॉ. कुमुद गोसावी‘फुलले रे क्षण माझे फुलले रे!’ असं एखाद्या नववधूसारखं भावस्पर्शी गीत जीवनातील आनंदानुभूतीच्या सागरात अथांग डुंबत एखादी निर्मळेसारखी संत चोखोबांची धाकुली बहीण मोठ्या भक्तिप्रेमानं म्हणते तेही आपल्या हृदयवीणेच्या तारा छेडत! तेव्हा त्या अंत:करणातील मर्मबंधाची ठेव जाणून घेण्यातही एक आगळीच अनुभूती येते.निर्मळा म्हणे सुखाचे सागर।लावण्य आगर रूप त्याचे।।मनानं अत्यंत निर्मळ व भावुक असलेल्या निर्मळेला मंगळवेढ्याला माहेरी असतानाच बंधू चोखोबांच्या संगतीत विठ्ठलभक्तीचा विलक्षण लळा लागला. तिनं आपल्या बंधू चोखोबांनाच मनोमन गुरू मानलं! त्यांच्याकडून चिरंतन सुखाचा नाम मंत्र मागून घेतला नि पुढं आयुष्यभर तो मनोभावे अनुसरला. भजला नि अन्यांनीही आचरणात आणावा या आपुलकीभावानं अतिशय सुलभ, सोप्या शैलीतून अक्षर करून ठेवला.सापडले वर्म सोपे । विठ्ठल नाम मंत्र जपे ।।मज नामाची आवडी । संसार केला देशधडी ।।आपल्या भाग्यानच भावाकडून आपल्याला एक बंदा रुपयाही न देता जी नाम मंत्राची अमृतसंजीवनी लाभली तिच्यातून अध्यात्मातील आत्मतत्त्वच हाती आले! नि पाहता-पाहता नाम गाता-गाता त्याची गोडी लागली. संसारसुखापेक्षा देवाचं नामच अधिक प्रिय झाल्यानं त्याचीच आवड अधिकाधिक वाढत गेली.नाही आणिक साधन । सदा गाई नारायण ।निर्मळा म्हणे देवा । छंद एवढा पुरवावा ।।असं आत्मकथनही निर्मळा अगदी अंत:करणपूर्वक करू लागली. आपण मुळातील जन्मानं हीन जातीय ठरल्यानं खरं तर बाहेर आपल्याला चोखोबांसारखा श्रेष्ठ गुरू कितपत भेटला असता? हा तर प्रश्नच होता. कारण जन्मापासून स्वत:च्या वाट्याला आलेली अवहेलना, उदंड उपेक्षा नि अवमान यांचीच काय ती निर्मळेशी ओळख होती. संसारतापांचे चटके नि फटके असह्य झाल्यानंच संसाराचा तिला वीट आला होता. आपल्या हृत्पटलावर समाजातील दुष्ट कर्मठांकडून केले गेलेले आघात, घातले गेलेले घणाघाती घाव तिला सोसणं असह्य झालं होतं.‘चहूकडे देवा दाटला वणवा’ असं आपल्या अंतरीचं दु:ख निर्मळानं मोजक्या शब्दांतून प्रकट केलं आहे. लौकिक संसाराचा आलेला उबगही तिनं व्यक्त केला आहे. क्षणभंगुर-नाशवंत प्रपंचातून आपल्या हाती दु:खाशिवाय दुसरं येणार नाही, याची तिला यथार्थ जाण आहे. विठ्ठलाची अनन्यभावानं आळवणी करताना भौतिकात जशी बहीण-भावांची एकमेकांशी लटकी भांडणं होतात, उणी-दुरी काढली जातात तशी तक्रार निर्मळानं अध्यात्मातही करावी याची गंमत वाटते. त्यातून तिचा भाबडा भावच व्यक्त होत असल्यानं ती तशी स्वाभाविक ठरते. ती म्हणते,अनाथ परदेशी तुम्हाविण कोण । सुखे समाधान करा माझे ।चोखियासी सुख विश्रांती दिधले । माझी सांड केली दिसतसे ।।निर्मळा म्हणे तारा अथवा मारा । तुमचे तुम्ही सारा वोझे माझे ।।चोखोबा- आपला भाऊ जर विठ्ठलभक्तीनं सुखी समाधानी होऊ शकतो, विठुचरणी त्याला जर विसावा मिळू शकतो, तर आपल्याला का नाही? का काही वेळा आई लेकीला डावलून लेकाचेच अधिक लाड करते. त्याला गोड-धोड खायला घालून मायेनं मांडीवर घेते नि मग लेक रुसूबाई रुसू होते नि गाल फुगवून का होईना आईच्या दुसऱ्या मांडीवर डोकं टेकू पाहते. असाच भाव निर्मळेच्या या भांडणात आहे. आपला अवघा भार तिनं विठुमाऊलीवर टाकला आहे. चोखोबाही आपल्या लाडक्या निर्मळेला नाममहिमा गाऊन तिला सत्प्रेरित करतात. तिच्या परमसुखाचा ‘परमेश्वरी नामस्मरण आवडीनं भक्तिभाव अखंड करव’ हाच एकमेव सुलभ मार्ग असल्याचं तिला अभंगरूपानंही समजावून सांगतात. तिच्या मनातील घालमेल शांतवण्याचं बळही नामात असल्याचं आवर्जून बजावतात.‘सुखाकारणे करी तळमळ। जपे सर्वकाळ विठ्ठल वाचे।तेणे सर्वसुख होईल अंतरा । चुकती येरझारा जन्ममरण ।।’असे आपल्या अनुभवाचे बोल बहिणीला सांगून सुखाचा मार्ग किती सोपा आहे! याचं स्मरण तिला वारंवार करून देतात. तिनंही आपल्यासारखं नामभक्तीनं रंगून अध्यात्म अंगी बाणवावं! हा भावच चोखोबांच्या या तळमळीतून स्पष्ट होतो. बहिणीची तळमळ चिरंतन सुखाकडं नेणारा हा बंधुभाव! भावासारखं भावजयीचंही निर्मळेवर निर्मळ प्रेम असल्याचं तिनं म्हटलं आहे.चोखा निर्मळा एकरूप । दरूशने हरे ताप ।वाचे विठ्ठल नाम छंद । नाही भेद उभयता ।तीर्थ उत्तम निर्मळा । वाटे भागीरथी जळा ।।असं बहीण-भावाचं-चोखाबा नि निर्मळेचं भक्तिमंदिरातील एकरूपत्व म्हणजे साक्षात देवत्वस्वरूपच, म्हणून तर त्यांच्या सत्संगात भवताप हरतात! असं प्रचीतीचं बोलणं म्हणजे लाभलेलं प्रेमभऱ्या कौतुकाचं अमूल्य लेणंच नाही का?ऐसी कळवण्याची नातीप्रेमाला प्रेमाचेच हेलकावे असतात ते व्यक्तीला अनुभवता येतात. मग मन प्रसन्नतेच्या डोलात बोलू लागतं. त्यात स्वत:ला विसरून जाता येतं. हेच तर अध्यात्माचं आंतरिक सूत्र आत्मानंदाची प्राप्ती करून देतं. त्यातून मिळणाऱ्या प्रेम ऊर्जेनं आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाता येतं. निर्मळेचंही आपल्या बहिणीवर सोयराबाईवर अस्सीम प्रेम होतं. सोयरा म्हणते,चोखा बैसता समाधीशी । निर्मळा आली पंढरीसी ।चोखा मेळविला रूपी । माझी आता कोण गती।।‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशी भावाच्या भेटीसाठी निर्मळा नेहमीच आसुसलेली असे. आपल्या सासरहून ‘मेहुणपुऱ्याहून संसारपसाऱ्यातून सुटकेची संधी मिळताच ती माहेरी धाव घेई नि ही भेट जर भक्तांचं माहेर असलेल्या पंढरपुरी आल्यास तर दुधात साखर पडे. कारण ही भावा-बहिणीची भेट केवळ लौकिकातील राहत नसे, तर त्या उभयतांचा भक्तिभाव एकरंगी, एकढंगी असल्यानं त्यांच्यातील द्वैत क्षणार्धात मावळून ते एकरूप होऊन जात! मात्र त्यांची अशी भावसमाधी लागली की, मग ‘माझं काय?’ असा लटका प्रश्नही सोयरा करते. एकदा लोकछळाला वैतागून चोखोबा मेहुणपुऱ्यास निर्मळेकडे चक्क महिनाभर राहिले. निर्मळा नि तिचा पती ‘बंका’ दोघेही महान विठ्ठलभक्त चोखोबांच्या येण्यानं सुखावले. सत्संगाचे सोहळे रोजच त्यांना रमवू लागले. निर्मळेला तर आकाश ठेंगणं झालं. तिच्या भक्तीला उधाण आलं. भक्ताला नाना प्रश्न विचारून भक्तिवाटेवरील पथदर्शकांची नव्यानं रोज ओळख करून घेण्यात तिचं मन अधिक रस घेत गेलं.देखोनी निर्मळा आनंदली मनी । धावोनी चरणी मिठी घाली ।बैसोनी शेजारी पुसे सुखमात । वहिनी क्षेमवंत आहेत की ।निर्मळा म्हणे पुढील विचार । कैसा तो साचार सांगे मन ।।चोखोबा असेच एकदा बायकोच्या बाळंतपणासाठी निर्मळेला आणण्यासाठी तिच्याकडं गेले नि नेहमीप्रमाणे भक्तिसोहळ्यात तिथं जाण्याचं कारणच विसरले. इकडं सोयरेला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. तिनं विठ्ठलमाऊलीला आर्त हाक मारली नि निर्मळेच्या रूपानं येऊन विठुमाऊलीनं तिची सुटका केली. कर्ममेळा जन्मास आला, अशी आख्यायिका असली तरी तिला संत नामदेवांनी अभंग साक्ष आहे.चोखोबाची बहीण झाला सारंगधर ।वहिनी उघडा द्वार हाका मारी ।।निर्मळा होऊन प्रसूती केल्यानंतर सोयराचा निरोप घेताना पांडुरंगानं म्हटलं,‘‘दादा माझा असे माझा पांडुरंग भला । सदा त्याचे चित्त देवावरी ।मान्य करी वहिनी तयाचे वचन । तेणेचि कल्याण असे तुमचे ।सांभाळी हा आता माझा ‘कर्ममेळा’। येईल चोखामेळा घरी आता ।।जागर शक्तीचा : स्त्रीशक्तीचा जागर तसा युगानंयुगं चालूच आहे. तशी तर अलीकडे नव्वदच्या दशकात स्त्रियांच्या आत्मभानाची चर्चा सुरू झाली. स्त्रीमुक्ती चळवळ सर्वत्र जागर घालू लागली; मात्र त्याची बीजं तेराव्या शतकातील संत वाङ्मयात विखुरलेली दिसतात. अगदी स्त्री संत वाङ्मयातूनही ती आढळतात. आपल्या अंतरिचं गुज सांगताना त्यातील स्त्रीसंतांचे भावस्वर सहजच शक्तिजागर घालून जातात.ऐसा आनंद सोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळा ।आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी ।जेथे नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंदसोयरा देखोनी आनंदली । वेळोवेळा विठु न्याहळी ।।निर्मळेच्या जीवनमुक्तीचा म्हणजे स्त्रीशक्तीचा सोयरा असा सहज जागर घालते, तर ‘मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू’ असं अधिकारवाणीनं आदिशक्ती मुक्ताई सांगते, ‘नाम तारक त्रिभुवनी । म्हणे नामयाची जनी ।’ असं अनुभवाच्या आधारे संत जनाई बजावते, ‘नाही मज आशा आणिक कोणाची । स्तुति मानवाची करून काय।’ असा प्रश्न निर्मळा विचारते.असा हा शक्तिजागर शतकानुशतकं स्त्री संतांनीही घालावा, ही देखील लक्षणीय बाब आहे. संतांनीही आपल्या वाङ्मयातून स्त्रीशक्तीची विविध रूपं चितारली. अगदी लोकधर्मी साहित्यातूनही अंबेची ‘गोंधळ गीत’, ‘जोगवा’, ‘वाघ्या-मुरळी’ची गाणी आदीतूनही शक्तिजागर निनादला आहे. स्त्रियांवरील लादल्या गेलेल्या पुरुषी-संस्कृतीची बंधनंदेखील स्त्रीशक्ती जागराच्या मुळाशी आहे. ‘गोंधळ गीतांतून’ रंगणाऱ्या कथानकात आवाहन असतं ते शक्तिदेवतेलाच. कारण गोंधळी हे अंबामातेचे म्हणजे शक्तिदेवतेचे तुळजाभवानीचे, रेणुकामातेचे उपासक असतात. ते आपल्या गोंधळ गीत-कथेतून ‘भूतमातृमहोत्सव’ साजरा करीत असल्याची नोंद पुराणग्रंथांतून आलेली आहे. या उत्सव काळात रात्री नाटकं, लळितं यांचे प्रयोग पूर्वी सादर होत असत. (स्कंदपुराण-खंड १). भविष्यपुराणाच्या मते ‘भूमाता-भूतमाता’ नि तिचे सहचर ‘पार्वती’पासून निर्माण झाले आहेत. असा शक्तिगौरव करतात. या उत्सवात लोक उत्साहानं गात, नाचत, खेळत त्यात पुरुषांचा अधिक सहभाग असे. लोकसंस्कृतीतल्या सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत अत्यंत आनंदविभोर होऊन श्रमपरिहार करणाऱ्या अशा स्त्रीशक्तिपूजक उत्सवातही प्रत्यक्षात स्त्री अंतरावरच असे.गणिका आज मेळे काय साधन केले । नामचि उच्चारिले स्वभावता ।चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शुद्रा ।।असा नाममहिमा गाताना स्वकालीन समाजातील स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या स्थानानुसार नामभक्तिबळावर होणाऱ्या उद्धाराच्या संदर्भातही ‘अधमा स्त्री शुद्रा’ असा निर्देश करतात, तर चोखोबा पत्नी सोयरा म्हणते, मी आपल्या बाईपणाची खंत मनी बाळगून स्पष्ट करते,‘सोयरा म्हणे पती ।मनी आली बाईची खंती ।।तर ज्ञानभक्तीच्या वाटेने जाऊन अध्यात्म सूत्र जाणून घेत जाणिवेनं सोयरा म्हणते, ‘किती हे मरती किती हे रडती । कितीक हासती आपआपणा ।सोयरा म्हणे याचे नवल वाटते । परी नाठवितो देवा कोणी ।।निर्मळेचे भावस्वर : एखादा परिवार आकंठ भक्तिरसात न्हाऊन निघावा, प्रत्येकाच्या अंतरी भक्तिगंध दरवळावा, त्यातून हृदयाच्या गाभाऱ्यातून भावस्वर उमटावा त्याचा रसिकांना काव्यानंद घेता यावा. याचा प्रत्यय देणारा संतस्त्री निर्मळेचा परिवार. पती ‘बंका’ भाचा कर्ममेळा नि भाऊ चोखाला नि वहिनी सोयराबाई याची ग्वाही देणारे या सर्व कुटुंब सदस्यांचे अभंग भावविश्वही लक्षणीय आहे.चोखियाचे घरी नवल वर्तले । पाहुणे ते आले देवराव ।सोयरा निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरी आला तेव्हा ।खोपट मोडके द्वारी वृंदावन । बैसे नारायण तया ठायी ।‘बंका’ म्हणे ऐसा कृपाळू श्रीहरी । चोखियाचे घरी राहे सुखे ।असं निर्मळेच्या परिवाराचं, चोखोबांच्या सुखी संसाराचं शब्दचित्र ‘बंका’ रेखाटतो. ‘सुखाचा सागर चोखा हा निर्धार । काय मी पामर गुण वानु । ‘असाही गौरव बंका करतो. निर्मळेप्रमाणे चोखोबांना बंकाही गुरू मानतो. गुरू इच्छेनुसार नामभक्तीत रंगून जातो. लौकिक संसारात येणाऱ्या समस्यांना सामोरं जाताना पत्नी-निर्मळेला विश्वासानं सोबत घेतो, तर या परिवारातील युवा पिढीतील कर्ममेळा अत्यंत परखड शब्दांतून विठ्ठलालाच जाब विचारतो.कशासाठी पोसियले । हे तू सांग बा विठ्ठले ।मज कोण आहे गणगोत । न दिसे बरी तुझी नित।मोकलिता दातारा । काय येते तुझे पदरा ।म्हणे चोखियाचा ‘कर्ममेळा’। वोखटपणा येईल तुला ।अशा या कर्ममेळ्याचं सामाजिक आघातांनी घायाळ झालेल्या मनानं प्रारंभी जरी देवाला दूषणं दिली असली तरी सोयरा, निर्मळा, चोखोबा, बंका यांच्या सततच्या कृतीद्वारा बोधानं कर्ममेळ्याचं आंतर्बाह्य वर्तन, परिवर्तन झाल्याची साक्ष त्यांचे पुढील अभंग देतात.तुम्हासी हो बोल नाही नारायणा । आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही ।कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण । आमुची निजखुण कळली आम्हा ।।कर्ममेळ्याचं परिवर्तन निर्मळेसह सर्वांनाच आनंददायी होतं, म्हणून तर निर्मळा म्हणते,आनंदे निर्भर नाचेन महाद्वारी । संत अधिकारी तेथीचे जे ।।निर्मळा करी प्रेमाची आरती । करोनी श्रीपति वोवाळित ।।आनंदविभोर होऊन निर्मळेनं आळवलेल्या आरतीतूनही तिचे असे आर्त भावस्वर झंकारतात. तिच्या भाग्यानं तिच्या ओंजळीत असे मधुर भावस्वर आले. भक्तीतलं मर्म तिला अचूक गवसलं. अध्यात्माची दिशा उजळली नि तिची भावस्वर आपल्या अभंगातून गुंफण्याची गतीही वाढली. अनुभूतीची कक्षा रुंदावत गेली. आनंदानुभूतीची स्पंदनं रुजवत गेली.आनंदे वोविया तुम्हासी गाईन । जीवे भावे वोवाळीन पारांवरी ।महाद्वारी चोखा तयारची बहीण । घाली लोटांगण उभयता ।।अशी आपली अनन्य भक्तिभावानं केलेली आयुष्याची वाटचाल कशी सफल झाली चिरंतन सुखाची अनुभूती देऊन गेली. एक निर्मळेसारखी दलित समाजातील संसारी स्त्री संतपदी कशी पोचते नि किती सुखी होते, याचा आदर्शपाठ आणखी कोणता हवा?
स्त्रीसंत निर्मळा
By admin | Published: October 12, 2016 12:51 PM