- मोहनबुवा रामदासीचातुर्ये शृंगारे अंतर। वस्त्रे शृंगारे शरीर। दोहीमध्ये कोण थोर बरे पाहा। । द . १४ स . ६ - १८वस्त्र , दागदागिने, स्नो-पावडर, ब्युटीपार्लरमधील विविध उपकरणे यांच्या साहाय्याने या नाशिवंत देहास सजवून कृत्रिमरीत्या सौंदर्य संपादन करण्याची सध्या स्पर्धा लागली आहे. बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल. पवित्र अंत:करणाची माणसं सर्वत्र लोकप्रिय होतात हे आपण पाहतोच. सुंदर दिसण्यापेक्षाही सुंदर असणं अधिक महत्त्वाचं आहे. परंतु बहुसंख्य माणसं व्यक्तीच्या बहिरंगावरून व्यक्ती थोर किंवा लहान हे ठरवतात?, हे बरे नव्हे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेसाठी गेले. भगवी वस्त्रं परिधान केलेला हा कोण विचित्र भिकारी आहे, म्हणून लोकांकडून त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु संधी मिळताच त्यांनी आपली विद्वत्ता, अंत:करणाची व्यापकता जगाला दाखवून दिली आणि सारे जग त्यांना ओळखू लागले. अंतरंगातील गुण हे सद्गुुणी माणसं व्यक्त होतात, तेव्हाच इतरांना समजतात. पूर्वी महात्मा गांधी, विनोबा, लोकमान्य टिळक, सावरकर, तर विद्यमान बाबा आमटे आदी विभूतींनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हे तत्त्व अंगीकारलं. श्रीसमर्थ रामदास स्वामी स्वत: फक्त कौपीन परिधान करून राहत असत. तरीही त्यांच्या विचारांनी ते समृद्ध असत, हे ध्यानात घ्यावयास हवे. म्हणून ते आपणास विचारतात की बहिरंग सजवणं आणि अंतरंग सजवणं यात श्रेष्ठ काय, याचा विचार करा. अर्थात, सद्गुुण संपादन करून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा आणि यशस्वी व्हा. याच अर्थाचा संत चोखामेळा यांचा अभंग प्रसिद्ध आहे.ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। नदी डोंगी परि जल नोहे डोंगा। चोख डोंगी परि भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।।
काय भुललासी वरलिया रंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 4:30 AM