आपले ध्येय सर्वभूतिस्थत रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे आणि सूक्ष्मरूपाने हृदयस्थ ईश्वर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी हे निर्गुण ब्रह्म सगुण रूप धारण करते. त्या सगुण रूपाला आधी जाणू या.
वाल्मीकींनी नारदांना प्रश्न केला, हे महर्षी, या वेळी या भूलोकावर गुणसंपन्न असा कोण आहे? वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, सदाचारी, विद्वान, समर्थ, प्रियदर्शन मनोनिग्रही, क्रोधाला जिंकलेला, तेजस्वी असा कोण आहे? हे जाणण्यास मी उत्सुक आहे. आपण ते सांगायला समर्थ आहात. तेव्हा नारदमुनी आनंदित होऊन म्हणाले, ‘इश्वाकुकुळात जन्मलेला राम आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिमान, वक्ता, वैभवशाली आणि शत्रुनाशक आहे. यानंतर नारदांनी अगोदर श्रीरामाचे वर्णन केले. त्यानंतर रामाच्या यौवराज्याभिषेकापासून ते राज्याभिषेकापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना कथन केल्या. नारदांकडून हे रामचरित्र श्रवण केल्यावर वाल्मीकी माध्यान्ह स्नानासाठी तमसा नदीवर जात असताना त्यांना क्रौंचवधाचे ते दुष्कृत्य पाहायला मिळाले. त्यांच्या मनात करु णा आली आणि त्यांनी श्लोकबद्ध शापवाणी उच्चारली. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी यथाविधी आचमन करून हात जोडून बसले असता योगधर्मामुळे श्रीरामचरित्राचे त्यांना ज्ञान होऊ लागले. वनवासात घडलेल्या घटनाही त्यांना करतलामलकवत म्हणजे करतळावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागल्या. याप्रमाणे संपूर्ण चरित्र अवलोकन केल्यावर त्यांनी रघुवंशामध्ये अवतीर्ण झालेल्या श्रीरामाचे चरित्र ग्रंथित केले ते रामायण. दशरथ राजा प्रतापी होता, धर्मज्ञ होता, उदार अंत:करणाने युक्त होता. पण त्याला वंश चालविणारा पुत्र नव्हता. त्याने वसिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ चालू असताना अग्नीतून एक महापुरुष निघाला. त्याच्या हातात दिव्य पायसाने भरलेली थाळी होती. त्याने दशरथाला ते पायस (खीर) त्याच्या राण्यांना द्यायला सांगितले. त्याप्रमाणे दशरथ राजाने आपल्या राण्यांना ते पायस विभागून अर्पण केले.
कौसल्येला पायसाचा अर्धा भाग दिला. सुमित्रेला अगोदर एक चतुर्थांश व नंतर पुन्हा एक अष्टमांश भाग दिला. कैकेयीला एक अष्टमांश भाग दिला. राण्यांनी ते पायस भक्षण केल्यावर त्यांना गर्भधारणा झाली. अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर सहा ऋतू लोटल्यावर चैत्रातील शुद्ध नवमीला लोकांना पूज्य असा जगदीश्वर राम कौसल्येच्या ठिकाणी उत्पन्न झाला.
अश्वमेध यज्ञ पूर्ण हो ऋ तु सहा,द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा,पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु,कर्क राशी असती लग्नी, चंद्र नी गुरू,कौसल्येस दिव्य असा पुत्र जाहला,जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।विष्णूचा अवतार, इश्वाकुनंदन,लोहिताश महाबाहु, उच्च रोदन,इंद्रवरे, तेजस्वी अदिती शोभते,कौसल्या पुत्रयोगे तशीच भासते,गगनातून सुमनांचा वर्षाव जाहला,जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।