जाजेबा कौसर चिश्ती- रमजान आणि कुरआन, या दोन गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. पैगंबर साहेबांवर रमजानच्या महिन्यात पूर्णपणे अवतरण झाले. याला तेवीस वर्षे लागली. पैगंबर साहेब एरवीपेक्षा या महिन्यात कुरआनपठणाचे जास्त इतमाम करायचे. त्यांना संपूर्ण कुरआन मुखोद्गत असले तरी ईशदूत हजरत जिब्रील (अ.स.) रमजानच्या महिन्यात त्यांच्याकडून कुरआन ऐकून घ्यायचे. त्यांच्या पवित्र जीवनातील रमजानच्या अंतिम महिन्यात जिब्रील अ.स. यांनी प्रेषित साहेबांकडून दोनदा कुरआन ऐकून घेतले आणि ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. आज आपण जे कुरआन वाचतो, अक्षरश: त्याचीच छापील प्रत आहे. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे, ज्यात १,४०० वर्षांपासून एका अक्षराचासुद्धा बदल घडून आलेला नाही आणि प्रलयापर्यंत याची शक्यताही नाही, कारण छापील आवृत्त्या, छापखाने, संगणक, मोबाईल फोन, इंटरनेट आणि त्यासारखी लोखंडी साहित्ये संपुष्टात आली तरी जगात अशी कोट्यवधी माणसे आहेत, ज्यांना पवित्र कुरआन संपूर्णपणे मुखोद्गत आहे. जगाच्या कुठल्याही भूप्रदेशात जा, त्यांच्या पठणातून काडीमात्रही फरक आढळून येणार नाही. पवित्र कुरआनच्या सुरक्षिततेची ही आस्मानी व्यवस्था आपण आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करू शकता. पवित्र कुरआनच्या या अद्भुत संरक्षणव्यवस्थेसंदर्भात अल्लाह स्वत: वचनबद्ध आहे. ‘‘इन्ना नहनु नज़्ज़लनज़ ज़िक्र व इन्ना लहू लहाफिज़ून.’’ (हे स्मरण आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत. - अल्हिज्र : १५:९)एक असा ग्रंथ जो जगात एकमेव आहे, अप्रतिम आहे, आकाशी आहे, जो प्रलयापर्यंत मानवाच्या मार्गदर्शनाची शपथ घेतो, खरे पाहिले तर माणसांनी जीवापलीकडे जाऊन त्याची कदर केली पाहिजे. आपण कुरआनला त्यागले तर तो आपला त्याग करेल आणि अशी माणसे त्याच्या संरक्षणाकरिता पुढे सरसावतील ज्यांचा जगाच्या इतिहासात कुठे उल्लेखही नसेल. रमजानच्या पवित्र महिन्यात जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करावे, त्याला समजून घ्यावे. आपल्या मुलाबाळांना ते समजून सांगावे, जेणेकरून आपल्याला कुरआन पठणाची सवय लागेल आणि आपले जीवन सफल करता येईल. (क्रमश:)
रमजान पुष्प : कुरआन पठणाचा महिना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 7:04 PM