- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवतार हा धर्मरक्षणासाठी व नीतीची स्थापना करण्यासाठी झाला. प्रश्न असा पडतो की वेदाने सांगितलेली नीती कोणती..? नीतीचे स्वरुप काय आहे..? तर सज्जनहो.! नीती म्हणजेच सदाचार होय. मानवी जीवन आचारप्रधान असावे. सदाचारानेच मानवी जीवनाला मूल्य प्राप्त होते. नीती हे सर्व धर्मांचे मूळ आहे. मानवी जीवनाला, सदाचाराला प्रवृत्त करणे हेच वेदाच्या नीतीचे अंतिम ध्येय आहे. सदाचाराच्या दोन बाजू आहेत - एक सद्गुणाची वृद्धी ही भावात्मक बाजू तर दुसरी दुर्गुणाचा त्याग. प्रत्येक माणसाने सदाचाराने जगावे, दुराचाराचा त्याग करावा, यासाठी संतांनी प्रबोधन केले. प्रकृतीला नीतीचे बंधन आवश्यक आहे. नीतीशिवाय प्रकृती म्हणजेच विकृती होय. नीतीसह प्रकृती म्हणजेच संस्कृती होय. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी नीतीमूल्ये जपणे व ते आचरणात आणने गरजेचे आहे.
रामायणात एक सुंदर प्रसंग आला आहे. प्रभु रामचंद्राच्या आज्ञेने लक्ष्मण हे सीतामाईला वनवासात सोडतात. ती म्हणते, भाऊजी एकदा माझ्याकडे नीट काळजीपूर्वक बघा. भाऊजी रघुकुलाचा वंश माझ्या उदरात वाढतो आहे आणि माझा त्याग प्रभू करीत आहेत. लक्ष्मण संस्कृतीला साजेसे उत्तर देतो. तो म्हणाला, वहिनी, तुझे रुप मी दादा असतांना देखील बघितले नाही, ते रूप मी आज दादा नसतांना कसे पाहू..?दृष्टपूर्वं न ते रुपं पादौ दृष्टौ तवानघे ।कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥
यालाच भारतीय संस्कृती म्हणतात आणि ही संस्कृती टिकविण्यासाठी नीतीची गरज आहे. संस्कृती जीवन घडविते तर विकृती जीवन बिघडविते. संस्कृती मानवाच्या ठायी मांगल्य प्रस्थापित करते. प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे यालाच विकास म्हणतात व प्रकृतीकडून विकृतीकडे जाणे याला ऱ्हास म्हणतात. आज संस्कृतीचे अभिसरण थांबत आहे की काय..? अशी शंका निर्माण होत आहे. कारण -परिवर्तन की धारामे हम इतने बदल गये ।बदल गया है सबकुछ हम हम नहीं रहे ॥
म्हणून नीतीचा आचार संवर्धित होण्याची नितांत गरज आहे. सदाचार हा समाजाला वारंवार शिकवावाच लागतो. तुकाराम महाराज म्हणतात -धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ।वाचा बोलो वेदनीती करु संती केले ते ॥
संताचा अवतार हा जगाच्या कल्याणाकरिताच झाला. माणसाचे खरे कल्याण हे धर्मतत्वांचे पालन करण्यातच आहे. त्याशिवाय समाजधारणा साध्य होणार नाही. समाज नैतिक मूल्यांचे आचरण करणारा असेल तरच समाजात शांती नांदेल. यासाठी संतांनी वेदातील धर्म व वेदातील नीती निष्ठेने आचरली व समाजाला शिकवली. भागवत धर्माचे खरे सार यातच साठवलेले आहे.
(लेखक हे स्वत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा मोबाईल क्र. 9421344960 )