अहमदनगर : मानवाला पुण्योदयाने पाच इंद्रिये प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा सर्व इंद्रिये महत्वाची. पण त्यातल्या त्यात डोळ्यांना प्रमुख स्थान प्रदान केले आहे. डोळ्यांना सतत पाहण्याचे कार्य आहे. परंंतु एकदा जर भगवंताचे दर्शन केले तर डोळ्यांना अन्यत्र कोठेही शांती मिळणार नाही. ज्याने क्षीर समुद्राचे दूध प्राशन केले, त्याला समुद्राचे खारट पाणी पिण्याची इच्छा होत नाही. रत्नप्राप्ती झाल्यानंतर चमकणाऱ्या तुकड्यांकडे कोण आकर्षिक होईल. त्याचप्रमाणे कानांनी संतवचन ऐकल्यास कान पवित्र होतात. आपल्या जीवनाचा कायापालट होतो. आम्रपाली राजनर्तकी असूनही एकदा भगवान बुध्दांची वाणी ऐकली. जीवनात अमूल्य परिवर्तन झाले. संत सौम्यमूर्ती पाहूनच अभिभूत होतात. म्हणतात.. आकृती गुणान्कथयती, चेहरा पाहूनच व्यक्तीच्या गुणांची कल्पना येते. सौम्यता चार प्रकारची सांगितलेली आहे. आकृतीची सौम्यता : चेहरा जर सौम्य असेल तर ती व्यक्ती सर्वप्रीय बनू शकते. जसे श्रेणिक महाराज वनभ्रमणासाठी निघाले असताना उद्यानामध्ये संत दिसतात. त्यांचा शांत, सौम्य चेहरा पाहून आश्चर्यचकीत होतात. स्वभावाची सौम्यता : स्वभावात सौम्यता असावी. उर्मटपणा वा उग्रता नसावी. सौम्य स्वभाव असेल तर सगळे आपले बनू शकतात. वाणीची सौम्यता : मुखातही वाणीची सौम्यता म्हणजे गोडवा असावा. गोडवा असेल तर शत्रुही आपले मित्र बनतात. कटूता असेल तर आपले स्वजन, मित्र सुध्दा शत्रू बनू शकतात. विचारांची सौम्यता : विचारांची सौम्यता म्हणजे सगळ्यांबद्दल मनात शुभविचार असावेत. सर्वांच्या कल्याणाची, कुशलक्षेत्राची भावना असावी. विचार शुध्द असतील तर आपले वर्तनही सौम्य बनेल.- साध्वी सन्मतीजी महाराज.
पुण्योदयाने पाच इंद्रियांची प्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 5:09 PM