- विजयराज बोधनकरएका प्रसिद्ध लेखकाला कार्यालयीन कामासाठी चुणचुणीत तरुणाची गरज असते. आपल्या प्राध्यापक मित्राला तो हे सांगतो. त्याच्या कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी असतो. त्याच्या वडिलांचा दारूमुळे मृत्यू झालेला असतो. आई घरकाम करून मुलांचे शिक्षण, घर चालवीत असते. प्राध्यापक त्या मुलाला लेखकाकडे पार्टटाइम नोकरीला पाठवतो. महिना-दीड महिना तो आनंदात काम करतो. गरीब मुलाला या कामातून चार पैसे मिळतात याचा आनंद लेखकाला होतो. लेखनाची आवड असलेला मुलगा अध्येमध्ये त्याने लिहिलेल्या कविता दाखवत असतो. याचा लेखकाला आनंद होतो, पण एक दिवस विचित्र घटना घडते.एके दिवशी मुलगा ऑफिस सुटल्यावर इमारतीखाली उतरतो. लेखकाचे घरही त्याच इमारतीत असते, लेखकाची बायको खिडकीतून बघते. मुलाच्या पाठीवरची बॅग जड सामानाने भरल्यासारखी वाटते. शंका आल्याने ती त्याला घरी बोलावते. बॅग तपासते तेव्हा त्यात ऑफिसमधली महागडी दहा-बारा पुस्तके आढळतात. कसून चौकशी केल्यानंतर तो सांगतो की, मी ही पुस्तके रद्दीत विकून पैसे मिळवतो. आतापर्यंत त्याने लेखकाच्या संग्रहातली बरीच पुस्तके विकलेली असतात. चोरी करून तो मोठा विश्वासघात करतो. त्याला कामावरून काढले जाते. ही बातमी कॉलेजमध्ये पसरते, त्याच्यावर चोर म्हणून शिक्का बसतो. प्राध्यापकाच्या मनातून तो कायमचा उतरतो. खरेतर, त्याला गरिबीतून वैचारिक आणि आर्थिक श्रीमंत होण्याची संधी प्राध्यापक देतात; पण त्याचे कुकर्म आडवे येते.यालाच ‘वैचारिक गरिबी’ म्हणतात. अशा घातक वृत्तीची गरिबी सतत पाठलाग करते. याचा दोष ही माणसे दैवाला देऊन मोकळी होतात. आयुष्यभर गरिबीच्या बाभुळीला खतपाणी घालतात. खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.
गरिबीची नेमकी कारणं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 4:17 AM