- ब्रह्मकुमारी नीता
मनुष्याचे धावते जीवन, कामाचे ओझे, संबंधांची गुंतागुंत यात आणखीन भर म्हणजे आपल्या मनात रोजच्या कामाचा कोलाहल, ताण-तणाव. कधी-कधी या सर्वांपासून खूप दूर कुठेतरी दाट वनराईमध्ये, पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज, कार्याची झुळूक या पर्वामध्ये कुठे अलगद येणारा झऱ्याचा आवाज... यांचा सहवास हवाहवासा वाटतो. कधी समुद्रकिनारी, वाळूमध्ये अनवाणी चालताना, लाटांचे आवाज, विशाल निळे आकाश, अथांग सागर, आकाशामध्ये ईश्वराने केलेली रंगांची उधळण... हे सारे दृश्य मनाच्या खोल दरीत घेऊन जाते. ही निसर्गाची साथ मनाला शांत, विशाल बनवते. जेव्हा प्रकृतीची ही सुंदर रचना बघतो तेव्हा नेहमी एक गाणं मनामध्ये अलगद गुणगुणलं जातं ‘ये कौन चित्रकार हैं, ये कौन चित्रकार...’ ईश्वराची ही चित्रकारी खरंच अद्भुत आहे. निसर्गाचं कोणतंही रूप असो, मग तो एखादा पक्षी, प्राणी वा छोटासा जीव असो, झाडे-फुले, फळे... असो सर्वांमध्ये काही ना काही विशेषता भरली आहे. या सर्व दृश्यांना पाहण्यासाठी मनुष्याकडे आज वेळ कुठे आहे? आजच्या गतिशील जीवनामध्ये विद्यार्थी वर्ग पुस्तकांचे ओझे उचलून शाळेकडे धावताना दिसतो. धावत-पळत ट्रेन पकडणाऱ्यांची त-हाच वेगळी आणि व्यापारी वर्ग सकाळी उठताच शेअर बाजाराचे भाव बघण्यामध्ये दंग. बाल-वृद्ध सर्वच आज या रहाटगाड्यात अडकलेले दिसतात. कामकाजाव्यतिरिक्त काही बोलणे, ऐकणे आणि विचारही करणे आज कठीण होऊन बसले आहे. ‘मन स्वस्थ तर तन स्वस्थ’ या गणिताला लक्षात ठेवायला हवे. मनाला ताजेतवाने करण्यासाठी रोज थोडासा वेळ निसर्गाबरोबर घालवावा.