- वामन देशपांडेमानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी भगवंतनामाचे अखंड स्मरण करण्याची बुद्धी प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी परमेश्वराची कृपा भक्तावर व्हावी लागते. अंत:करणात राग, द्वेष, स्वार्थ, अहंकार सदैव जागृतावस्थेत वावरत असतात, तोपर्यंत मनातले द्वंद्व थांबतच नाही. त्यासाठी रागद्वेषादी समाप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. हे विश्व केवळ परमेश्वरी अस्तित्वानेच भारलेले आहे. ही दृढता जेव्हा मनात पूर्णांशाने स्थिर होते, तेव्हाच चित्तात स्थिरता, समता, एकाग्रता यांचे प्राबल्य दाटून येते आणि तीच खरी साधनेची सुरुवात असते. तो शुभयोग परमेश्वरी कृपेनेच प्राप्त होतो. त्यासंदर्भात भगवंत म्हणतात,योगस्थ: कुरू कर्मणि सग्डत्यक्त्वा धनश्चय।सिद्धयासिद्धयो : समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।गीता : २:४८।।पार्था, आपण जे कर्म करतो, त्या कोणत्याही कर्मात आणि कर्मफलात आसक्तीभाव चुकूनही उमलून येता कामा नये. निर्लेप मनाने कर्म केले तर कर्तृत्वभाव आपोआप गळून पडतो. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे कर्मफलात मन अडकतच नाही. त्याचा अप्रतिम परिणाम म्हणजे सिद्धी आणि असिद्धीत समतोल भाव निर्माण होईल. निष्काम कर्मयोग हीच मनाची स्थिरता. आपण करीत असलेल्या साधनेने भगवंत प्रसन्न होणे, आपण त्याचे लाडके भक्त होणे, ही खरेतर करीत असलेल्या आपल्या साधनेची फलश्रुती आहे. याचे भान साधकाला येणे अत्यंत आवश्यक आहे.
मानवी मनानं भगवंतनामाचे स्मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:11 AM