- फरेदुन भुजवालासाधना-विधीबाबत ऊ बा खिनजींशी चर्चा सुरू असताना, त्यांनी सत्यनारायण गोएंका यांना विचारले, शील सदाचाराला विरोध आहे का? गोएंका म्हणाले, ‘शील सदाचाराला कोणीही विरोध करीत नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘दहा दिवसांच्या शिबिरात आम्ही तुम्हाला शील पालन कसे करावे, हे शिकवू़ शील पालन करण्यासाठी मनाला वश करणे अनिवार्य आहे.मनाला एकाग्र करून त्याला वश कसे करावे हे शिकवू़ त्याला आम्ही समाधी म्हणतो़ तुमचा समाधीला विरोध आहे?’
गोएंका म्हणाले, ‘समाधीला आमचा विरोध नाही़’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘समाधीने शील अखंड होऊ शकत नाही. समाधीने वरवरचे चित्त एकाग्र आणि निर्मळ जरूर होते, परंतु अंतर्मनात जुन्या विकारांचा संग्रह साठविलेला असतो़ त्याला बाहेर काढल्याशिवाय अंतर्मनाच्या खोल कप्प्यात सामावलेला दूषित स्वभाव बदलत नाही़.
समाधी पुष्ट झाल्यानंतरसुद्धा अंतर्मनात संग्रह केलेल्या आणि सुप्तावस्थेतील विकारांचा ज्वालामुखी न जाणो केव्हा फुटून बाहेर पडेल़ तेव्हा समाधीद्वारे एकाग्र आणि निर्मळ झालेले वरवरचे मन विचलित होते आणि शील भंग होतोच़’ सयाजींनी समजावले की, अंतर्मनाच्या तळाशी खूप खोलवर अनेक जन्मात संग्रहित केलेल्या सुप्तावस्थेतील विकारांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रज्ञा शिकवतो़ स्वत: आपली प्रज्ञा जागृत केल्यानंतर नवे विकार बनविणे बंद होते आणि जुने विकार आपोआप वर-वर येऊन नष्ट होतात.
अभ्यास करता-करता एक वेळ अशी येते की, मन सगळ्या विकारांपासून मुक्त होते़ तुमचा प्रज्ञाला विरोध आहे? विकारमुक्तीला विरोध आहे? गोएंका म्हणाले, ‘आमचा शील, समाधी, प्रज्ञेला विरोध नाही़’ त्यावर ते म्हणाले, ‘बस, विपश्यनेत आम्ही हेच शिकवतो़ शील, समाधी, प्रज्ञा, हाच भगवान बुद्धांचा उपदेश आहे़’ गोएंका यांनी ठरविले़, हा अभ्यास निश्चितच चांगला आहे़ तो करावा आणि १ सप्टेंबर, १९५५ रोजी ते शिबिरात सहभागी झाले़