- डॉ. विजय जंगम
महर्षी पातंजल हे योगशास्त्राचे महागुरू. भगवान श्रीकृष्ण यांना ‘योगेश्वर’ म्हणतात. महर्षी पातंजलांच्या मते प्राणायाम केवळ स्वास्थ्य, सुदृढता पुरवून थांबत नाही, केवळ रोगनाशक प्रतिकारशक्ती वाढवून गप्प बसत नाही, तर अत्यंत उच्च कोटीचे आत्मज्ञान त्यांच्यामुळे आपल्याला मिळते. प्राणायामामुळे ज्ञानावरचे पटल/आवरण दूर होते. अशिक्षित, अर्धशिक्षित असणारा मनुष्य ज्ञानदीक्षा घेऊन उपासना करेल, तर त्याच्या संचित कर्मांच्या (चुकीच्या) संस्कारातून आलेला संस्कारमल नाहीसा होईल. विवेक जागा होऊन तो विवेकशील होईल. मनाची चंचलता कमी होत-होत संपेल, तसतशी त्याची धारणशक्ती वाढेल.
श्रौतसूत्रं, धर्मसूत्रं आणि गृह्यसूत्रं ही जरी धार्मिक कर्मकांड मार्गदर्शन करणारी असली, तरी त्यांनीही गृहस्थाला उपयुक्त प्राणायाम चर्चा केलेली आहे. सर्वांनी प्राणायाम महती गायलेली आहे. आपस्तंभ सांगतो की, जप करीत असता प्राण (वायू) आत ओढून धरावा! बौधायन सूत्रात ॐकार गायत्री जपासहित कुंभक करण्यासंबंधी चर्चा आहे.
ही धावती चर्चा करायचे एकच कारण आहे आणि ते महत्त्वाचे आहे. प्रस्तुत लेखकाचा अधिकार हा त्याच्या मागची परंपरा धुंडून लोक मानतात. ‘अभ्यासेन ही ज्ञानम्!’ यावर बहुसंख्यांचा विश्वास आहे. त्यांना आता हायसे वाटेल की, ही व्यर्थ वाचाळता नसून यात काही पूर्वसूत्र आहे.
प्राण स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकारचे आहेत. दोन्हींवर नियंत्रण आणणारा प्राणायाम अभ्यास आहे. हा प्राणाचा व्यायाम नसून प्राणावर अंतिमत: नियंत्रण आणणे, अंकुश लावणे हे प्राणायामाचे अंतिम लक्ष्य आहे. नाथपंथी यांनी योगाभ्यासात मोठी मजल मारलेली होती. गोरक्षनाथ यांच्या मते आपली जीवनावस्था हिलाच प्राण संज्ञेने ओळखले जाते. या अवस्थेचे निरोधन करण्याला ‘प्राणायाम’ म्हणतात.
श्वासोच्छवास नियमितपणे चालतो आणि त्यात ठरावीक अंतराने विराम घेतले जाऊन तो शरीरात घेणे व बाहेर सोडणे या क्रियांना ‘प्राणायाम’ असे नामाभिधान मिळाले आहे. या नैसर्गिक, स्वाभाविक क्रियेवर जेव्हा स्वास्थ्य अभ्यासाने, नियमपूर्वक बंधनांनी स्थिर केले जाते, तेव्हा त्या क्रियेला ‘प्राणायाम’ म्हणतात. या क्रियेने दीर्घायुष्य लाभते. कोणतीही विद्या ही विनाअट मिळत नसते. प्राणायाम क्रियेसाठीही नियम आहेत, त्यांचे पालन होणे तितकेच अगत्यांचे, अनिवार्य असे आहे. ब्रह्मचर्यपालन, योग, आहारविहार, शांत स्वभाव राखून मगच प्राणायाम क्रियेचा अभ्यास करावा.