आपुलिया हिता जो असे जागता ।धन्य माता पिता तयाचीया ।।कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ।तयाचा हरीख वाटे देवा। ।
संस्कारक्षम अपत्ते हीच खरी संपत्ती आहे. अशी अपत्ये स्वतः नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार करू शकतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून केली जाते. तेव्हाच ते कार्य पूर्ण होते. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी अशा मातापित्यांचा हेवा ईश्वराला देखील वाटतो असे सांगितले आहे. कार्यसिद्धी आणि स्वहितापासूनच देशाचे बीज पेरले जाते. स्वहित याचा अर्थ या ठिकाणी समाजहित हा धरलेला आहे. मानवी मनाला वळण लावणाऱ्या घटनांची सुरुवात घर नावाच्या छोट्या विश्वापासूनच होते. आणि त्यात आई-वडील यांचा सिंहाचा वाटा असतो. कोणतेही लहान बाळ हे अनुकरण करीत असते. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटना या त्यांच्यावर परिणाम करत असतात. लहान वय हे संस्कारक्षम तर असतेच पण त्याची पाटीही कोरी करकरीत असते. अशा कोर्या पाटीवर बालपणास दिलेल्या संस्कारावरच पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते.
प्रत्येकात नर आणि नारायण, देव आणि दैत्य गुणांचा वास उपजतच असतो. परंतु सभोवतालची परिस्थिती यामध्ये असणाऱ्या काहीच गुणांना आकार देते. लहानपणी संस्कार माणसाला राम ही बनू शकते किंवा त्याचा अहंकारी रावन देखील बनविते. संस्कारात फार मोठी ताकद आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी संस्कार केले तर छत्रपती शिवाजी महाराज घडले. योग्य दिशाही देशाला तारक ठरते हिन्दवी स्वराज्य ही संकल्पना ज्या मातेने लहान मनात रुजविली त्यामुळेच हिंदुस्थान जन्मला. तुझ्या पायाला घाण लागली तर चालेल परंतु तुझ्या मनाला घाण लागता कामा नये असे ज्या आईने सांगितले तिथे सानेगुरुजी घडले. संस्कार रुजवावे लागतात. आपण जसे स्वतःचे आचरण ठेवतो, त्याचप्रमाणे अनुकरणप्रिय पिढी निर्माण होते.
ऐसा पुत्र दे गा गुंडा ।ज्याचा त्रिभुवनी झेंडा ।।असे ठणकावून सांगणारे संत तुकाराम महाराज होते. याठिकाणी गुंडा याचा अर्थ सर्वगुणसंपन्न हा आहे. संस्काराची दिशा ठरलेली नसते. सर्वांना चांगली सर्वगुणसंपन्न समाज निर्मिती हवी आहे. पण ते कसे होणार याचा दिशादर्शक नकाशा नाही. विकृत, असंस्कारित पिढीपेक्षा अशी अपत्ये नको, म्हणणारे धाडसी व्यक्तीची ओळख देणारी प्रत्येक पिढी ही फार काही योगदान देण्यात पारंगत आहे. याउलट माझ्या अपत्यासाठी संपत्ती संचय जास्तीत जास्त कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रत्यक्षात आपल्या वाट्याला येणारे सुख हे ज्याच्या त्याच्या कर्माने मिळत असते. कोणीही धनसंचय करून सुखी पिढी अथवा सुखी समाज निर्माण करू शकत नाही. तरीदेखील बहुतांश व्यक्ती या भौतिक सुखाच्या मागे लागून इतर मार्गाने धनसंचय करीत आहे. खरे तर आनंदी व्यक्तिमत्व, सकारात्मक विचार, सद्गुणी विद्वान आणि पराक्रमी पिढी निर्माण होणे जास्त गरजेचे आहे.
चांगली संस्कारी अपत्ये झाली तर त्यांना धनसंचय करून देण्याची गरज नसते. कारण ती स्वतः सक्षम असतात. संस्काराचे मोती हे बालकाचे पहिले गुरू म्हणजे आई यांच्या पासून सुरुवात होते. आईचे व कुटुंबातील संस्कार योग्य झाले, तर समाज सुधारक तयार होण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच प्रथम माता-पिता गुरु आहे. माझे ते माझेच मित्रांचेही माझेच असा म्हणणारा व्यक्ती केव्हाही सुखी होऊ शकत नाही. माणसाला देण्याची कला अवगत करावी लागते. संस्कार, सुविचार, सद्वर्तन, दिल्याने कमी होत नाही. उलट त्यात वाढत होते. चांगल्या पिढी निर्माण झाल्यास भूतलाचे स्वर्गात रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. या भूतलावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, संत नामदेव यासारखे संत जन्माला आले. ती संतभूमी स्वर्गापेक्षा कमी नाही. संस्कार आणि सभ्यता याच भारत मातीत जन्म घेतात. व अमरत्व प्राप्त करतात. याच मातीने देशभक्त दिले, तर याच मातेने समाज सुधारक देखील दिले. फक्त आपल्यासाठीच नाहीतर सर्व विश्वाचे कल्याण होवो. असे म्हणणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली अवघ्या सोळाव्या वर्षी जगाच्या कल्याणाची काम करणे म्हणजेच विश्वरूप सामावणारे संत माऊली आपल्याकडे होऊन गेले. अमृतवाणीने सर्वांना मोक्ष मार्ग दाखवणारे आणि एका शब्दात विश्वाचे कल्याण चिंतणारे माऊली होय त्यांच्या विचारांची आज खरी गरज आहे.
- डॉ.भालचंद्र. ना.संगनवार, ( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )