प्रत्येक भक्ताला वाटत असते की आपल्याला गुरु प्रसाद प्राप्त व्हावा. प्रसाद म्हटल्यानंतर प्रत्ये काच्या डोळ्यासमोर कोणती तरी वस्तू येते. मग ती खाण्याची असेल किंवा इतर वस्तू असेल. गुरुप्रसाद नुसत्या वस्तूच्या रुपात नसून इतर दुसऱ्या कोणत्या तरी रुपात असू शकतो. व तो म्हणजे परमेश्वराच्या पाठिंब्याची आवश्य कता. प्रसाद म्हणजे केवळ नैवेद्या चा प्रसाद किंवा जेवण इतका संकुचित अर्थ न घेता प्रसाद म्हणजे आनंद मिळणे किंवा तृप्तता प्राप्त होणे होय. श्रीगुरूची उपासना करणे, नित्याने त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या उपासनेचा ध्यास लागणे हे नित्य करणे आवश्यक आहे. त्यापासूनच गुरुप्रसादाची प्राप्ती होईल. एकदा गुरूप्रसाद प्राप्त झाल्या नंतर, ईश्वरी अनुभव आल्यानंतर आत्मनिरिक्षण करणे सोपे जाते. गुरुप्रसाद इतका प्रभावी असतो की, आपल्याला आपल्या आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. हे दर्शन तेजोमय असते. जेव्हा ते अनुभवायला येते तेव्हा ते डोळे झाकले असतानाही दिसते, उघडे असतानाही दिसते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणाही दिसते. हे चैतन्य केव्हा डोळ्यापुढे उभे राहील याचा भरवसा नसतो. हे चैतन्य इतके तेजस्वी व स्वयंभू आहे की त्यामधे जिवंतपणा असतो याची आपल्याला पूर्णपणे जाणीव होते. ज्या गुरुंची आपण सेवा करतो ज्यांच्या आश्रयाला आपण येतो ते गुरूस्थान जन्म जन्मांतरी पुण्य केलेल आहे, म्हणून आपल्याला लाभू शकते. गुरूप्रसाद प्राप्त होणे हे पूर्व सुकृतावर अवलंबून आहे.पूर्व सुकृत जर श्रेष्ठ नसेल तर गुरु प्रसादही प्राप्त होणार नाही. या जन्मी गुरूप्रसाद प्राप्त करून घ्यावा लागतो व ह्या करिता काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आपले गुरु आपल्याकडे जेव्हा प्रसन्न चित्ताने, प्रसन्न मनाने पहातील, त्यांच्या मनाचा आनंद ओसांडून जाईल तेव्हाच आपल्याला गुरूप्रसाद प्राप्त होईल. गुरु प्रसाद म्हणजे वाणीने ऐकलेले ज्ञान समोरच्या व्यक्तीला समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगणे ह्यातच खरे बुध्दीकौशल्य आहे व बुद्धीकौशल्य हा सुध्दा ईश्वरी प्रसादच आहे. आपण भक्ती करीत असताना आपल्या ठिकाणी असलेले नाना तऱ्हेचे दोष जाण्याची आवश्यकता आहे. जसेजसे आपण गुरुकृपेला पात्र होऊ तसतसे इच्छिलेले फळ मिळते, असा गुरुकृपेचा प्रसाद आहे. आपण जे कर्म करतो त्यातून कुठलाही संशय उत्पन्न होत नसेल तर गुरुकृपेचा प्रसाद आज ना उद्या तुम्हाला प्राप्त होईल. तसेच संकटे आली असताना सुद्धा आपण आपल्या विचारांना अधिक प्रमाणात टिकून राहिलो तर गुरूप्रसाद प्राप्त होण्याची शक्यता लवकर निर्माण होईल. आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आशिर्वादात्मक प्रासादिक खडीसाखर देतो. ह्याच्या सेवनाने तुमचे कल्याणच होणार आहे. रोज एक किंवा अर्धा खडिसाखरेचा तुकडा खात जा. त्याचे स्वरूप बदलू नये. काही भक्त घरातील साखर संपली की ह्या प्रासादिक खडीसाखरेचा चहात उपयोग करतात हे योग्य नाही. ज्या स्वरूपात प्रसाद दिला आहे त्या स्वरूपातच त्याचा उपयोग झाला पाहिजे. तरच त्याचा चांगला परिणाम होतो. जर त्या प्रसादाचे स्वरुप बदलले तर त्यातील चांगले गुण नष्ट होतात व ती वस्तू एकदम सामान्य बनते. तेव्हा ह्याची विशेष काळजी घ्यावी. आपल्या आश्रमात देवाचे अधिष्ठान आहे. येथे आम्ही जेव्हा प्रसाद घ्यायला सांगतो तेव्हा तो जरुर घ्यावा. ह्या अन्नाला एक विशेष प्रकारची चव असते. येथील प्रसाद घेतल्याने तुमचे दोष कमी होतात. फक्त आश्रमा सारख्या ठिकाणचे अन्न खाण्याने दोष कसे कमी होतात याचा खुलासा विज्ञान देवू शकत नाही. आम्ही तुम्हाला जो प्रसाद देतो तो दयेचा भाग आहे. पण तुम्हा लोकांना प्रसाद मागण्याचा जेव्हा अधिकार प्राप्त होतो व त्यावेळी आम्ही जे देतो ते तुम्हाला पूर्णत्वाला नेते. तेव्हा या गोष्टी मिळविण्याकरिता त्याग करावा लागतो. गुरुंची सेवा करणे, कर्तव्याची भावना असणे ह्या गोष्टी असाव्या लागतात तेव्हा प्रसाद म्हणजे आपण देवतेला प्रेमाने दिल्यावर तो आपल्याला प्रसादाच्या रुपाने परत देतो. म्हणून देवाला काहीही लागत नाही अशी कल्पना करून कोणीही देवापुढे रिक्त हस्ताने जाणे अयोग्य आहे.
- शून्यानंद संस्कारभारती