- सदगुरू श्री वामनराव पै
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म
लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ”हा एकच श्लोक पुरेसा आहे.हयात भगवंताने काय सांगितले आहे.सर्व धर्म परित्यज म्हणजे नुसते त्याज्य म्हटलेले नाही.तुम्ही म्हणाल परित्यज्य व त्याज्य यात फरक आहे?सांगतो त्यज्य म्हणजे सौम्य व परित्यज्य म्हणजे गंभीर.परित्यज्य म्हणजे सोडूनच दे.त्याचा विचार करूच नको.सर्व धर्मांचा त्याग कर व मला शरण ये असे श्रीकृष्णाने सांगितले असे लोक म्हणतात पण हा त्याचा खरा अर्थ नाही.एकाने मला विचारले वामनराव कृष्णाने हे म्हटले आहे ते चूक आहे का? मी म्हटले अरे वेडया कृष्णाने मला शरण असे असे म्हटलेले नाही तर मी ला शरण जा असे म्हटलेले आहे. गंमत अशी की लोकांना गीतेचा खरा अर्थच कळत नाही.सर्वधर्म परित्यज्य असे कृष्णाने सांगितले हे बरोबर आहे.अरे पण धर्म कुठला श्रीकृष्णाने हे सांगितले तेव्हा प्रचलित कुठलाच धर्म तेव्हा नव्हता.आपला खरा धर्म आहे वैदिक धर्म व त्यात सुधारणा झाली व तो झाला भागवत धर्म.खरे सांगायचे तर हिंदु धर्म हा धर्म नसून ती हिंदु संस्कृती आहे.मग सर्व धर्माचा त्याग कर म्हटले तर तो धर्म कुठला असा प्रश्न निर्माण होतो.धर्म म्हणजे मार्ग हे नेहमी लक्षांत ठेवावे.सर्व धर्म हे उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.प्रत्येक धर्मात उपासनेचे मार्ग निरनिराळे असतात.खरे तर सर्व धर्म धर्म नसून निरनिराळे संप्रदाय आहेत.त्यामुळे खरा धर्म एकच आहे तो म्हणजे मानव धर्म किंवा विश्व धर्म.जीवनविद्येच्या भाषेत सांगायचे तर जीवनधर्म.तुम्ही सुखाने जगा, व इतरांना सुखाने जगू दया हया धारणेला खरा धर्म असे म्हणतात.जीवनविद्येने सोपे करून सांगितले.लोक आम्हाला विचारतात धर्म धर्म म्हणजे काय हो वामनराव?माझ्यामतो तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म आहे.आज लोक स्वत:ही सुखाने जगत नाहीत व इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत.आज दहशतवादी काय करतात ते इतरांना मारतात व स्वत:ही मरतात.स्वत:ही दु:खी होतात व इतरांनाही दु:खी करतात.हे लोक किती पाप करतात हयाची त्यांना कल्पना देखील नाही.