- सदगुरू श्री वामनराव पै
स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या
स्वर्ग व नरकाच्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक जीवन जगत असतात.जीवनविद्या सांगते असा स्वर्ग व नर्क कुठेच नाही आहे.मग लोक मला विचारतात वामनराव हे तुम्ही कशावरून म्हणता. लक्षात ठेवा मी जे सांगतो त्यामागे नेहमी तर्कशास्त्र असते.तुम्ही बघा आतापर्यंत तुमचे पणजोबा गेले, आजोबा गेले, वडिल म्हणत नाही कारण वडिल अजून असतील पण जे गेले त्यांच्यापैकी कुणीतरी सांगितले का की मी इथे स्वर्गात सुखात आहे किंवा मी नरकात दु:खात आहे. असे कुणीतरी तुम्हांला येऊन सांगितले का आजीने,पणजीने सांगितले का किंवा तुमचा मित्र गेला त्या मित्राने सांगितले का कुणीही येऊन असे सांगत नाही| त्यांनी तुम्हांला फोन किंवा फॅक्स केला का, एसएमएस केला की मोबाईलवर फोन केला का काहीही केले नाही.स्वर्ग नर्क हया कल्पना सांगितल्या गेल्या तेव्हा त्या मागे त्यांचा हेतू चांगला होता.लोकांनी चांगले वागावे,चांगले जीवन जगावे,आनंदाने रहावे हा त्यामागे हेतू होता.ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे“स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले आहे.स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या हयाचा अर्थ काय तर स्वर्ग व नर्क याबाबत जे सांगतात ना ते चोर आहेत.सांगायचा मुद्दा असा सर्व धर्म परित्यज्य याचा अर्थ सर्व उपासना मार्ग सोड व मी ला शरण जा.आता मी म्हणजे कोण “तैसा ह्रदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम” त्या रामाला शरण जा.जो तुझ्या ह्रदयांत आहे.ज्ञानश्वरी वाचताना कशी वाचली पाहिजे ते लक्षांत घ्या.तैसा ह्रदयामध्ये मी असे वाचले की थांब मग कोण राम कसा राम याचा विचार कर.सर्व सुखाचा आराम याचा नीट अर्थ लक्षांत घेवून वाच. ज्ञानेश्वरी भरभर वाचून तुला काय कळणार.यासाठी ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी अनुभवाव.भगवतगीता पाठ करण्यापेक्षा तुम्हाला त्यातील एक तरी श्लोक समजला. व तुम्ही तो जगाला समजावून सांगितला तर जग सुखी होईल. तुम्ही जे सर्व धर्म म्हणता ते मुळात धर्मच नाहीत तर ते उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.उपासनेचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.कुणी प्रार्थना करतं,कुणी नमाज पडतं तर कोणी पारायण करतात तर कोणी चर्चमध्ये जावून प्रार्थना करतात. हे उपासनेचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या सर्वांचा देव एकच आहे.देव वेगवेगळे असते तर भांडणे नसती का झाली? परमेश्वर एक आहे.सबका मालिक एक असे साईबाबा सांगायचे ते अगदी खरे आहे.सर्वांचा देव हा एक आहे आता त्याची उपासना कशी करायची हे मात्र तू ठरव.तू अमूकच कर किंवा तमूकच कर अशी जबरदस्ती कोणावरही कोणी करु नये.प्रत्येकाला जे आवडते ते त्याने करावे.मला अळुची भाजी फार आवडते म्हणून तुम्ही देखील तीच खाल्ली पाहिजे अशी जबरदस्ती करुन कसे होईल.