डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजएखादा शोध लागणे, त्याची योग्यता तपासणीसाठी चाचणी घेणे, हे खरे म्हणजे अनोळखी वाटेवरून चालण्यासारखे असते. प्रयोगशाळेत त्याचे मन लागते की नाही, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कोणताही शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो, तेव्हा त्याचे मन त्या उपक्रमाशी एकरूप झालेले असते. रात्रंदिवस त्याच्या मनात तोच प्रयोग सुरू असतो. आपले संशोधन नवीन आणि सर्वाेत्तम कसे असेल, याच ध्येयाने तो झपाटलेला असतो. त्यामुळेच जगामध्ये उत्तम शास्त्रज्ञ तयार झाले आहेत. शास्त्रज्ञ हा स्वत:च्या संशोधनात मनापासून रममाण होतो. त्यामुळे त्याची झोप कमी होते. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या संशोधन प्रक्रियेकडे लागलेले असते. ठरावीक गोष्टी सोडल्या तर त्याचे मन त्यातच रममाण असते. आपल्या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतलेले असते. नवीन नवीन संशोधन करून देशाच्या हितासाठी त्याचा उपयोग व्हावा हीच त्याची अपेक्षा असते. तीच त्याची देशसेवा असते. शास्त्रज्ञ हे संधीचे आणि वेळीचे सोने करतात. नियोजन आणि चिकाटी हे त्यांचे अंगभूत गुण असतात. त्यांचे मन हव्या असलेल्या माहितीचे संदर्भ शोधण्यात पटाईत असते. आपल्या सर्जनशीलतेला अथवा संशोधकवृत्तीला मारक ठरतील अशा गोष्टींपासून ते आपले मन दूर ठेवतात. कारण संशोधनाचा मोठा प्रभाव संपूर्ण जगावर तसेच कित्येक पिढ्यांवर पडणार असल्याची जाणीव त्यांना असते. त्यामुळेच आपल्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तो सतत मग्न असतो. वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्याच्या मनामध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार होते. सगळेच शास्त्रज्ञ विशिष्ट रीतीने प्रयोग करीत असतात. प्रयोग करताना त्यांना वेळेचीसुद्धा मर्यादा राहात नाही. त्यांच्या वेळेनुसार ते अधिक काम करतात. ते नेहमी वेगाने काम करतात. आपल्या निर्मितीवर ते नेहमीच पूर्णपणे लक्ष ठेवून असतात. जगाला काय हवे आहे, याचा ते अंदाज घेत असतात. त्यामुळेच जगात नवे शोध लागत असतात.
विविध शोधांमुळे क्रांतिकारी बदल घडत आहे, याचे कारण शास्त्रज्ञांची जिज्ञासा, प्रयोगशीलता, चिकाटी हे गुण महत्त्वाचे असतात. संशोधन करून एखादा शोध लागला की, तो शास्त्रज्ञ लोकप्रिय होतो. त्याचे जगभर कौतुक होते. कोणताही शास्त्रज्ञ कशावरून तरी प्रेरणा घेत असतो. त्यानुसार आपल्या कृतीमध्ये बदल करीत असतो. शास्त्रज्ञ अपयशाला कंटाळत नाहीत, आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करणे सोडत नाहीत. त्यामुळे वेगवेगळी कौशल्ये असलेला कुशल संशोधकांचा एक गट तयार होतो. त्यामुळे इतरांना प्रेरणा व नवीन दिशा मिळते. शास्त्रज्ञांचे मन शांत व जिद्दी असते. एकाग्र मनामधूनच शोध लागतात.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)