- डॉ. दत्ता कोहिनकर- रूपेशने वडिलांना विश्वासात न घेता परस्पर रजिस्टर्ड प्रेमविवाह केल्याने वडिलांबरोबर त्याचे कडाक्याचे भांडण होऊन त्याला घर सोडावे लागले होते. पाच वर्षे झाली होती. तो वडिलांशी बोलत नव्हता. काही लग्न समारंभात त्याला वडिलांना नमस्कार करून बोलावेसे वाटायचे पण त्या भावना तो अहंकारामुळे दाबून ठेवून वडिलांपासून दूर जात असे. विपश्यनेच्या, ध्यानाच्या शिबिरात त्याला वडिलांची खूप आठवण आली व वडिलांनी त्याच्यासाठी उचललेल्या कष्टांनी त्याचे मन भरून आले, अपराधीपणाची भावना त्याने आचार्यांजवळ व्यक्त केली. शिबिर संपल्यानंतर आचार्यांनी त्याला वडिलांकडे जाऊन माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमचा खूप ॠणी आहे, असा भाव व्यक्त करावयास सांगितला. शेवटी शिबीर संपल्यावर तो डायरेक्ट वडिलांकडे गेला. बेल मारल्यानंतर वडिलांनीच दार उघडले. तो म्हणाला, बाबा - माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा ॠणी आहे. बाबांनी हे ऐकताच त्याला मिठी मारली दोघेही अश्रू गाळू लागले. त्यादिवशी रूपेशला खूप ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. एकच आठवडयात वडिलांना हृदयविकाराने मृत्यूला सामोरे जावे लागले. दोन वर्षांपूर्वीच वडिलांना एक अॅटॅक आला होता. पण रूपेशला त्यांनी कळवलं नव्हते. मित्रांनो..रूपेश जर वडिलांना भेटून भावना व्यक्त करू शकला नसता तर त्याला अपराधीपणाच्या भावनेने आयुष्यभर छळले असते. म्हणून मनातील भावनांना जाणून योग्य वेळी त्यांना वाट मोकळी करून दिल्याने मनावरचे ओझे खूप हलके होते. भावनांना नीट वाट दिली नाही तर भावनांचा उद्रेक होऊन अनर्थ घडण्याची दाट शक्यता असते.. भावनांचा उद्रेक झाला त्यांचे दमन झाले की मनुष्य क्रुरतेकडे व नैराश्याकडे झुकतो. अलिकडे ज्या कुटूंबात जास्त कलह - व्यसन - भांडणे आहेत किंवा आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले गेले आहे. अशा मुलांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्यांच्या हातून हिंसक घटना घडताना दिसतात. नातवाने आजीचा खून करणे, नकार दिला म्हणून मुलीवर अॅसिड फेकणे, चाकूहल्ला करणे हे यातीलच प्रकार होत. भावनांचा समतोल ढळला की निद्रानाश, रक्तदाब, अल्सर यासारखे अनेक आजार शरीरात बळावतात व ताणतणाव वाढतो. म्हणून आपल्या मनातील भावना संबंधित लोकांसमोर वेळेनुसार व्यक्त करा. फक्त व्यक्त करताना त्यामुळे आपले व समोरच्या व्यक्तीचे नुकसान होणार नाही व सामाजिक शांतता, सुव्यवस्था टिकून राहील व संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच आपली प्रज्ञा जागवा. व्यक्त करता न येण्यासारख्या भावना कागदांवर लिहून काढा व न वाचता तो फाडून टाका. भावनांना वाट देण्यासाठी योग्य ते माध्यम शोधा, व्यायाम करा, खेळ खेळा, गप्पा मारा, विनोद करा, नाचा - बागडा, मोठयाने गाणी म्हणा, सहलीला जा, समोरच्याचे ऐकून घ्या, त्याला सहानुभूती दया. अनेक मित्र-मैत्रिणी गोळा करा, समोरच्याच्या भावनांचा आदर करा, दु:ख झाले तर रडून घ्या, राग आला तर घरातील उशीवर (पिलो) राग शांत होईपर्यंत गुद्दे मारा. योगासने करा, ध्यान करा व आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्यक त्यावेळी बिनधास्त व्यक्त होऊन भावनांना वाट द्या. यातच सुखी जीवनाचे रहस्य दडलेले आहे.
मनः शांती - सुखी जीवनाचे रहस्य : भावनांना वाट द्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 7:54 PM