प्रिय मित्र ,आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे. मित्रा, समाजाचे हित, दलित, गरीब, अज्ञानी यांना उन्नत करण्यासाठी ज्यांची अहोरात्र धडपड चाललेली असते व भाविकांच्या या श्रद्धेला फळाफुलानेही प्रसन्न होऊन जो त्याच्या हृदयाचे बोल ओळखतो व त्याच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून रानावनात जाणे पत्करतो, गरीब किसानाची मुले शाळेत जात नव्हती व त्यांना समाजधर्माचे यथार्थ ज्ञान नव्हते म्हणून गाईगुरे चारण्याचे निमित्त करून ब्रह्मज्ञान देतो व धर्म स्थापनेसाठी म्हणजे अन्यायाच्या प्रतिकाराची शक्ती निर्माण करण्याकरिता ज्याने आपले जीवन पणाला लावले आहे अशा मानवांनाच आम्ही सगुणदेव मानले आहे व असाच पुरुष देवत्व प्राप्त करू शकतो, अशी आमची धारणा आहे. म्हणून ज्या कुणी असे जीवन घालविले असेल ते सर्व आमचे देव झाले आहेत. हीच आमची सगुण देवाची व्याख्या आम्ही केलेली आहे. अशांचे चरित्र पवित्र भावनेने वाचून आपणही त्यांचे वाटेकरी होऊ या. मनाला असे संस्कार देण्याकरिताच आपण देवळात जावे आणि त्या पाषाण मूर्तीकडे प्रेमळ नेत्राने, अष्ट-सात्विक भावाने बघावे. म्हणून मी तुम्हाला सगुण-भक्ती सांगत असतो. पाषाण पूजण्यासाठी नव्हे तर ज्यांनी मानवजातीवर उपकार केले त्यांचे स्मृतिचिन्ह पाहून आपल्यालाही तोच छंद लागावा व आपल्या हातूनही असे देवप्रिय कार्य घडावे, हाच त्याचा उद्देश आहे. एरव्ही निर्गुण देवाला आपण कसे जाणणार? कारण जाणणे हे सुद्धा निर्गुणाचा विषय होऊ शकत नाही. संत म्हणतात, ‘जाणीव नेणीव भगवती नाही’ यावरून निर्गुणाची वाचिक संगती लावता येते व एवढा वृत्तीचा सूक्ष्मपणा ज्यांना अनुभवता येतो त्यांनी खुशाल निर्गुणाचा मार्ग चोखाळावा. पण तुमच्यासारख्या भाविकांनी त्यात पडू नये. खुशाल देवळात जावे. नाम घ्यावे. चिंतन करावे व पवित्र कार्याला लागावे. हेच जरी आपणाला साधले तरी आपण देवाच्या प्रीतीला पात्र होऊ शकतो. म्हणूनच मी सगुण देवाचे भजन महान आहे, असे आपणास सांगितले आहे. -तुकड्यादास
सगुणभक्तीचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:26 AM