खूप वर्षांचा प्रवास करून आत्मा गर्भामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आईलासुद्धा स्वत:च्या विचारांवर, मनोदशेवर, जेवणावर लक्ष द्यावे लागते. विचारांची ऊर्जा सतत त्या बाळापर्यंत पोहोचत असते. ती कोणाविषयी नकारात्मक असेल, तर त्या बाळामध्येसुद्धा त्या व्यक्तीबद्दल तसेच विचार निर्माण होतात. बाळ जन्माला येण्याच्या आधीच गर्भामध्ये बसून बाहेरचे वातावरण, होणारी चर्चा अनुभवत असते. म्हणूनच प्रत्येक संबंधांप्रति त्याच्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण करण्याची हीच वेळ आहे. त्याचबरोबर काही चांगले विचार त्या बाळापर्यंत पोहोचविले तर त्याला समजण्याची क्षमता ही त्यावेळी त्या आत्म्यामध्ये असते. मला जर माझं बाळ गुणी हवं असेल तर त्याला रोज ‘तू शांत आहेस, गुणी आहेस. माझी प्रत्येक गोष्ट तू ऐकत आहेस’, असे विचार त्याला रोज देण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरामध्ये येणारा हा नवीन पाहुणा आपल्या वातावरणामध्ये रुळण्यासाठी विचारांची सकारात्मक ऊर्जा वेळोवेळी त्याच्यापर्यंत पोहोचवावी. जो दृष्टिकोन घेऊन आपण जगतो, त्या दृष्टिकोनानेच ते बाळही जीवनाला बघू लागते. भले कितीही दु:ख पुनर्जन्मामध्ये त्याने सोसले असेल; पण आपण त्याची खूप देखभाल करणार आहोत, खूप प्रेम त्याला आपण देणार आहोत अशी निश्चिंतता त्याला करून द्यावी. जेणेकरून त्याची उत्तम मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यास मदत मिळेल. शारीरिक पोषणाबरोबर मानसिक पोषणावरही ध्यान असावे. आपण खूश तर आपले बाळही खूश राहील. गर्भसंस्कार म्हणजेच बीजारोपण. शक्तिशाली, प्रेमळ, सकारात्मक विचारांचे खतपाणी त्या आत्म्याला देण्याची ही वेळ असते.- नीता ब्रह्मकुमारी
गर्भसंस्काराचे बीजारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 6:03 AM